नवी मुंबई : नेरूळ विभाग कार्यालयाकडून अनधिकृत बॅनर, होर्डींगवरील कारवाईचा अहवाल मागवून फौजदारी गुन्हे किती लोकांवर दाखल केले आहे, त्याचीही माहिती मागवण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई अनधिकृत बॅनर, होर्डींग लावणे बेकायदेशीर असून त्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा अधिकार आहे. नेरूळ पश्चिमेला स्टेशन रोड ते रेल्वे फाटकापर्यत, तेरणा कॉलेज चौक राजीव गांधी उड्डाण पुल परिसर, नेरूळ रेल्वे स्टेशनबाहेरील पश्चिमेचा भाग, नेरूळ सेक्टर १६-१८ मधील चौक, एनआरभगत शाळा चौक, सेक्टर सहा सुश्रुषा रुग्णालयाजवळील अंर्तगत रस्ता, तसेच सर्वच सेक्टरमधील आतील व बाहेरील रस्त्यावर, अगदी पथदिव्यावर बाराही महिने अनधिकृत बॅनर व होर्डींग लागलेले असतात. बसथांब्यावरही अनधिकृत बॅनर लागलेले असतात. याशिवाय नेरूळ सेक्टर सहामध्ये प्रवेश करताना महापालिकेचे नेरूळ सिव्ह्यू उद्यान आहे. या उद्यानात पालिकेने आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी जाहिरातीसाठी लोखंडी कमान उभारली आहे. त्या कमानीवर स्पष्टपणे ही जागा आरोग्य खात्याकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातीसाठी असून अन्य कोणी बॅनर व होर्डींग लावल्यास कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख आहे. तथापि या बॅनरवरही बाराही महिने बॅनर लागलेले असतात. विशेष म्हणजे पालिकेचा अतिक्रमण विभाग ज्यांच्या अखत्यारीत आहे, ते डॉ. कैलास गायकवाड हे या लोखंडी कमान लावलेल्या समोरच्याच इमारतीमध्ये राहत असून त्यांच्याही नजरेला बॅनरचे अतिक्रमण दिसू नये, ही नवी मुंबईकरांसाठी शोकांतिका आहे. महापालिका सर्वच ठिकाणी अनधिकृत बॅनर व होर्डींगवर दररोज कारवाई करत नसल्याने नेरूळ पश्चिमेला बकालपणा वाढला असून महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईस टाळाटाळ करत असल्याने बॅनर व होर्डींगचा सुकाळ झालेला आहे. आपण नेरूळ पश्चिमच्या बकालपणाविषयी अतिक्रमण विभागाला लेखी जाब विचारताना कारवाईची माहिती व आजवर किती जणांवर अनधिकृत बॅनर लावले म्हणून फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, याची माहिती मागवून घ्यावी. सेक्टर सहामध्ये आजही पथदिव्यांवर व्यावसायिकांच्या जाहिराती तशाच आहेत, त्यातून किती महसूल दररोज मिळत असल्याने नेरूळचा अतिक्रमण विभाग कारवाई करत नाही, याचीही लेखी माहिती मागवण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांडे केली आहे.



