नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबविण्याची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रुपाली किसमत भगत यांनी आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. प्रभागातील रहिवाशी गेल्या काही दिवसांपासून उंदरांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. सोसायटी आवारात खड्डे करणे, वाहनांच्या वायरी कुरतडणे, घरात वाळत घातलेले कपडे कुरतडणे असे प्रकार उंदरांकडून होत असल्याने उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक रहिवाशांनी आमच्या कार्यालयात येवून केलेली आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. उंदरांच्या सुळसुळाटामुळे लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर समस्येचे गांभीर्य पाहता प्रभागात मूषक नियत्रंण मोहीम राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किसमत भगत यांनी केली आहे.



