सिडको सोडतधारकांच्या घरांच्या किंमती गणेशोत्सवापूर्वी कमी करण्याची मागणी
स्वयंम न्यूज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सिडकोने २६००० घरांची काढलेल्या सोडती मधील घरांच्या किंमती अत्यंत महाग असल्याने मागील अनेक महिन्यांपासून मनसेने सिडको सोडतधारकांना सोबत घेऊन मोठा लढा उभा केला आहे. उप मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा बैठकीचे आश्वासन देऊन ही बैठकीस येण्यास टाळले. एवढे महिने होऊन सुद्धा राज्य सरकार किंवा सिडको अजून घरांच्या किंमती कमी करत नाही. या संबंधी मनसे प्रवक्ते व शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सिडको सोडतधारकांचा संयमचा बांध आता सुटत चालला आहे. सिडको अजून सर्व सामान्यांची किती परीक्षा बघणार असा प्रश्न विचारत राज्य सरकारने गणेशोत्सवापूर्वी या घरांच्या किंमती कमी नाही केल्या तर मनसे सिडको सोडत धारकांना घेऊन ठाण्यामध्ये उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला. सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रविण दरेकर, विक्रांत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शशिकांत शिंदे यांनी हा विषय अधिवेशनात मांडला. मंत्री उदय सामंत यांनी या घरांच्या किंमती जास्त असल्याचे मान्य करत २० ते २५% नी घरांच्या किंमती कमी करू असे सभागृहात मान्य केला असताना घरांच्या किंमती कमी का होत नाहीत? मंत्री गणेश नाईक दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना भेटत असताना ते हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडून का सोडवत नाहीत असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला. तरी घरांच्या किंमती कमी नाही झाल्या तर गणेशोत्सव काळात सुद्धा मनसे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या बाहेर आंदोलन करेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला. वाशी मधील सिडको च्या गृहनिर्माण प्रकल्पा ची जागा वाहनतळ साठी आरक्षित असताना सिडको तिथे गरिबांसाठी घरे कसे बनवू शकते. जर इथे घरे बनवली आहेत तर या घरांच्या किंमती एवढ्या प्रचंड महाग का? तर दुसरीकडे बेलापूर, सेक्टर-१५ मध्ये ३०-४० करोड खर्च करून ६०० गाड्यांसाठी वाहनतळ तयार आहे. पण वाहतूक कोंडी होत असताना बार आणि हॉटेल बाहेरील गाड्या इथे गाड्या पार्क करायला येत नाहीत. बार आणि हॉटेल मालकांच्या अर्थपूर्ण दबावामुळे विभाग अधिकारी अमोल पालवे आणि ट्रॅफिक अधिकारी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्यावर तोडगा काढत नाहीत का असा प्रश्न ही गजानन काळे यांनी उपस्थित केला.
नेरुळ, सेक्टर-२८ मध्ये प्लॉट क्र. १२(अ), प्लॉट क्र. १२(ब), प्लॉट क्र. १२(क), प्लॉट क्र. १२(ड) या भूखंडावर महानगरपालिका विकास आराखड्यात अनुक्रमे खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिक – विकलांग, उद्यान, पोलीस स्थानक या साठी आरक्षण आहे. असे असताना सिडकोने हे भूखंड चढ्या भावाने बांधकाम व्यवसायिकांना विकले. मुळात पालिका विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी असताना राज्य सरकारची सिडको ही संस्था या विकास आराखड्याला केराची टोपली दाखवून परस्पर भूखंड कसे विकू शकते असा सवाल गजानन काळे यांनी विकास केला. पालिकेचा नगर रचना विभाग कागदी घोडे नाचवण्या व्यतरिक्त ठोस काही कारवाई करणार की नाही असा सवाल उपस्थित करत मनसे या भूखंडावर कोणतेही बांधकाम होऊ देणार नाही असा इशारा गजानन काळे यांनी दिला. या पत्रकार परिषदेत गजानन काळे यांच्या सोबत मनसे उप शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव सचिन कदम, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे व अनेक सिडको सोडतधारक हे उपस्थित होते.



