महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेशोत्सव पनवेलमध्ये
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
पनवेल : सतत गेली १३ वर्षे प्रयोगशील आणि सृजनशीलतेच्या वेगळ्या अनुभवातून पनवेलच्या महागणपतीचा महागणेशोत्सव साजरा करून अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कृतीची दालने खुली करताना भक्त, रसिक, चिकित्सक, समीक्षक, कला दिग्दर्शकांच्या अभ्यासू वृत्तीला ताण देत अनोख्या प्रयोगातून सजावट केली जात आहे. जयपूर, राजस्थानी शैलीतील हुबेहूब भव्य राजावाडा उभारला गेला असून यंदा प्रथमच संस्थेने भक्तांच्या विशेष सेवेकरिता संपूर्ण राजवाडा वातनकुलित केला आहे.
कांतीलाल प्रतिष्ठान रायगडच्या पनवेलचा महागणपतीचे यंदाचे १४ वे वर्षे आहे. न्यू गुजराती शाळेच्या मैदानावर (पटवर्धन हॉस्पिटल समोर) महागणपतीकरिता सुमारे सात हजाराहून अधिक स्वेअर फुटचा राजवाडा उभारला गेला आहे. राजवाड्यात सुबक आणि सुंदर रचनात्मक शैलीत आरास, फिलर, आर्च, झरोख्यांचा साज देण्यात आला आहे. आतल्या वैविध्यपूर्ण रचनेसह ५० फुटी उंचीचे भव्य प्रवेशद्वार भुरळ घालत आहे. अ
तिशय संरचनात्मक आणि कोरीव कामाच्या उत्तम नमुन्यातून फायबरला आकार देत प्रवेशद्वार उभारण्यात आला आहे. उत्तम आणि तितकेच आकर्षक डोम, गजलक्ष्मीच्या आकारातून साकारलेले नक्षीकामाने नटलेले पिलर आणि आकाशाशी नातं सांगणारे भगवे ध्वज हिंदुत्वाची साक्ष देत असला तरी सर्वधर्मियांच्या पसंतीला, हाकेला प्रतिसाद देणारा महागणेशोत्सव असल्याने पनवेलची कीर्ती सातासमुद्रा पार नेणारा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सार्वजनिक गणेशोत्सव मानला जात आहे.
राजवाडा आणि प्रवेशद्वाराचे पूर्णतः काम अतिशय मजबूत करण्यात आले आहे. मंडपचे काम जर्मनी पद्धतीने हँगरचे करण्यात आले आहे. याशिवाय लोखंड आणि लाकडी काम अधिक सुशोभनिय करण्यात आले आहे. कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पनवेलच्या महागणपतीचा राजवाडा नव्याने विविध शैलतीतून पाहता येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून भक्तांनी आयोजकांकडे वातानुकुलित राजवाडा करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा प्रथमच संपूर्ण महल वातानुकुलित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक, कार्यकर्ते, कवी, गजलकार, नाटककार तसेच लोकमुद्रा जनहित पार्टीचे पक्षाध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली आहे.
सुवर्ण पिठापूर पनवेल असे स्थळ महात्म्य निर्माण करण्यात आले असून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे.
गणेश जयंती ते अनंत चतुर्दशीच्या पूर्वरात्रीपर्यंत भजन, लोकसंगीताचे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यासाठी वेगळा रंगमंच, विशेष अतिथीकरिता आसन व्यवस्था, भक्तांसाठी आसन व्यवस्था, पूजेसाठी खास पुजारी अशा वैविधतेने नटलेला सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेशोत्सव ठरणारा असल्याचा दावा कांतीलाल कडू यांनी केला आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र उत्सवाला पुरेपूर दाद देणारा महागणेशोत्सव आणि वर्षभर सातत्यपूर्ण कार्यक्रमातून संस्कृती जतन करणारे कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने हा सुद्धा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
यंदाची गणेशमूर्ती श्री विठ्ठल रूपातील एकदम भव्यदिव्य आणि तितकीच मनोहरी, मदनाचा पुतळा अशीच ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे असणार आहे. निखिल राजन खातू यांच्या शिल्पकलेची उत्तम शैलीतील तेजस, देखणी मूर्ती असणार आहे.
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर त्यांच्या एक पाऊल पुढे जात महागणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांचा मानस आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीचा विक्रम मोडणारा पनवेलचा महागणपती गणेशोत्सव यंदा दरवर्षीपेक्षा जरा जास्तच दिमाखादार होणार आहे. मुंबई चर्नी रोडच्या कारखान्यातून महागणपती पनवेलला आणला जाणार आहे. भाविकांनी स्वागत करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, अशी प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.



