स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी व्होट चोरीप्रकरणी तातडीची पत्रकार परिषद आयोजित केल्याने ते नेमका काय धमाका करणार आहेत? मतदारयाद्यांबाबत काय खुलासा करणार आहेत, याचीच नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आता अवघ्या अडीच-तीन महिन्यावर आलेल्या असताना रवींद्र सावंत यांनी मतदार याद्यांबाबत कोणता घोटाळा उघडकीस आणला आहे, अथवा ते कोणाकोणावर काय आरोप करणार आहेत? याचीच उलटसूलट चर्चा आताच सुरु झाल्याने रवींद्र सावंत यांची व्होट चोरीबाबतची पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरणात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लागलेले निकाल पाहिल्यावर मतदारयाद्यांबाबत सुरु झालेली कुजबुज आजही थांबण्याचे नाव घेत नाही. ऐरोली मतदारसंघातील विक्रमी मतांनी झालेला विजय आणि बेलापुर विधानसभा मतदारसंघातील निसटता विजय पाहिल्यावर या निकालाकडे संशयाने पाहिले जात आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रभागरचना स्पष्ट झालेली असून अनेकांचे प्रभाग तोडले गेले असून देशातील व राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिवसेनेने स्वत:च्या नगरसेवकांना अनुकूल अशी प्रभाग रचना बनविली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या घटकांकडून केली जात आहे. भाजपा व शिवसेनेतील नवी मुंबईच्या स्थानिक पातळीवरील विळ्याभोपळ्याचे नाते पाहता महायुती होईल की नाही याबाबत संशयाचे वातावरण आहे. प्रदेशपातळीवरुन आलेल्या दबावामुळे युती झाली तरी पाडापाडीचे राजकारण होण्याची शंभर टक्के शक्यता आहे. प्रभाग हद्द निश्चित झाल्यावर अनेक राजकीय घटक पॅनेलमध्ये जुळवाजुळवीच्या राजकारणात व्यस्त असतानाच रवींद्र सावंत यांनी मतदारयाद्यांबाबतच व्होट चोरीच्या मुद्यावर तातडीची पत्रकार परिषद बोलविल्याने राजकारणात चर्चांना उधान आले आहे.
रवींद्र सावंत हे प्रारंभापासून कट्टर कॉंग्रेसी असून आंदोलने, निदर्शने या माध्यमातून त्यांनी बेलापुर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस केवळ जिवंतच ठेवली नाहीतर वेळोवेळी नावारुपाला आणण्याचा प्रयत्नही केला आहे. ते जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असताना महायुतीमधीलच एका घटकांने त्यांना या पदापासून लांब ठेवले असल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात उघडपणे बोलले जात आहे. कॉंग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी हे व्होटचोरीप्रकरणी देशभर रान माजवित असताना रवींद्र सावंतही यांनी हाच मुद्दा उचलल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात रवींद्र सावंत प्रकाशझोतात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



