शितल पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६च्या आत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना गती आली आहे. नवी मुंबईतील राजकारण आता महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ढवळून निघाले आहे. भाजप व शिवसेनेमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक अटीतटीची होणार आहे. नवी मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व आपलाच महापौर विराजमान करण्यासाठी भाजप व शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर राजकीय कलगीतुरा झडण्यास प्रारंभ झाला आहे. या निवडणूकीवर प्रभाव टाकून शकेल असा हुकमी एक्का असणाऱ्या व पाठीशी जनाधार असणाऱ्या माजी आमदार संदीप नाईकांची राजकीय भूमिका स्पष्ट न झाल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्या अनेक राजकीय घटकांना संदीप नाईकांच्या भूमिकेची प्रतिक्षा आहे.
संदीप नाईक हे नवी मुंबईच्या राजकारणात ‘विकासपर्व’ म्हणून ओळखले जाते. अन्य राजकीय घटकांना पक्षाच्या पाठबळावर मतदान होते. त्या तुलनेत संदीप नाईक थोडेसे उजवे आहे. संदीप नाईकांच्या पाठीशी त्यांचा स्वतंत्र असा जनाधार आहे. संदिप नाईकांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवू अथवा मविआकडून निवडणूक लढवू. त्यांचा स्वतंत्र जनाधार त्यांच्यासोबत असतो. संदीप नाईक म्हणजे एक स्वतंत्र विचारधारा आहे. विकासाचे एक व्हिजन आहे. एक विचार आहे. कृती आणि उक्ती यामध्ये संदीप नाईकांची एकवाक्यता आहे. मोजकेच बोलणे, कामाला गती देणे ही संदीप नाईकांची कार्यप्रणालीच आज नवी मुंबईकरांच्या पसंतीस पडली आहे. २०१४ साली देशभरात मोदी लाट असतानाही संदीप नाईक ऐरोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. २०२४ साली संदीप नाईकांनी मविआतून निवडणूक लढविली असता अवघ्या ३७७ मतांनी संदीप नाईक पराभूत झाले. संदीप नाईक अवघ्या २० ते २५ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आले होते. त्यातही निवडणूक लढवून त्यांनी नव्वद हजारांपेक्षा अधिक मतदान घेतले. ऐरोली विधानसभा आजही राजकारणात संदीप नाईकांचा गड आहे. बेलापूरातही निकराची झुंज दिली. कमी कालावधीत यंत्रणा राबवून घेतलेले मतदान पाहिल्यावर संदीप नाईक हे ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघाचा विचार केल्यास नवी मुंबईकरांच्या मनातील नेतृत्व कोण आहे आणि खऱ्या अर्थांने नवी मुंबईकरांच्या मनातील कोण आमदार आहे, याचे उत्तर मतपेटीतून पहावयास मिळते.
अवघ्या चार महिन्यावर नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. निवडणूक लढवू पाहणाऱ्या राजकीय घटकांनी कंबर कसली आहे. महापौर बसविण्यासाठी, सत्ता मिळविण्यासाठी भाजप व शिवसेनेत प्रतिष्ठेची लढत बनली आहे. विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील असंख्य राजकीय घटकांनी संदीप नाईकांसाठी रात्रीचा दिवस केला होता. संदीप नाईकांचा विजय हा संदीप नाईकांपेक्षाही इतरांसाठी प्रतिष्ठेचा विषय होता. संदीप नाईक आमदार व्हावेत ही नाईक समर्थकांचीच नाही तर उबाठा सेना तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधीलही अनेकांची प्रामाणिक भावना होती. त्यामुळे अनेक ठिकांणी नाईक समर्थकांहून राष्ट्रवादी व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत केल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे. संदीप नाईकांसाठी विधानसभेसाठी आपण जीवाचे रान केले आता पालिका निवडणूकीत संदीप नाईकांनी आपली पाठराखण करावी, अशी भूमिका मविआतील अनेक घटकांकडून व्यक्त केली जात आहे. संदीप नाईकांनी भाजपात प्रवेश न केल्याने व आजही ते जनसंवादांच्या माध्यमातून जनसमस्या निवारणात सक्रिय असल्याने संदीप नाईकांच्या पाठीशी असलेल्या जनाधाराचा आपणासही फायदा व्हावा यासाठी मविआतील घटक संदीप नाईकांनी मविआचे नेतृत्व करावे, असा सूर मविआच्या छावणीतील अधिकाधिक राजकीय घटकांकडून आळविला जात आहे.
भाजप व शिवसेनेत कितीही राजकीय संघर्ष सत्तेसाठी सुरु झाला असला तरी संदीप नाईकांना डावलून महापालिकेच्या सत्तेची समीकरणे बांधणे कोणालाही शक्य नाही. महापालिकेवर विजयाची गुढी उभारण्यासाठी संदीप नाईकांची साथ असणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकीबाबत कोणी कितीही वल्गना केल्या तरी संदीप नाईकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. निवडणूकीनंतर नाईक ज्यांना अॅसेट समजतात, त्या अॅसेटचे उद्योग व भूमिकेबाबत बेलापूर मतदारसंघात लपून राहिले नाही. अॅसेटला पालिकेत जाण्यासाठी संदीप नाईकांचा आशिर्वाद व सहकार्य असणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. संदीप नाईकांना दुखावून अथवा डावलून त्या अॅसेट स्वत:ला स्वंयभू समजत असतील तर त्यांना पालिका निवडणूकीत तिकिटीपासून विजयापर्यंत मोठ्या प्रमाणावर अडथळ्याची मालिका पार पाडावी लागणार आहे.



