नवी मुंबई : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीदरम्यान नवी मुंबईतील राजकीय आखाड्यात रंगत वाढत चालली असताना सत्तेसाठी शिवसेना-भाजपमध्ये कमालीची संघर्ष निर्माण झाला आहे. सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग १९ मध्ये पांडुरंग आमले व सौ. शारदा पांडुरंग आमले हे दांपत्य अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात सहभागी झाल्याने सर्वच राजकीय समीकरणात उलथापालथ झालेली आहे.
पांडुरंग आमले हे राजकारणात भाजपचे कट्टर कार्यकर्ते असून बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निकटवर्तीय आहेत. कोरोना काळापासून सानपाडा नोडमध्ये करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे पांडुरंग आमले नावारुपाला आलेले आहेत. सातत्याने विविध उपक्रम राबवित पांडुरंग आमले यांनी जनसामान्यात काम करताना भाजपचा जनाधार वाढविला आहे. धार्मिक, राजकीय, क्रिडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करत पांडुरंग आमले यांनाच भाजपचे तिकिट हमखास मिळणार, असे मानले जात असतानाच त्यांचे तिकिट कापले गेले. पांडुरंग आमले यांचे तिकिट कापले गेल्याने सानपाडामधील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. तिकिट कापले गेल्याने सानपाडावासियांचा उद्रेक झाला व त्यांच्या आग्रहास्तव पांडुरंग आमले व त्यांच्या पत्नी सौ. शारदा आमले यांना निवडणूक रिंगणात सहभागी व्हावे लागले. प्रभाग १९ मशील क गटातून शारदा आमले कपबशी निवडणूक चिन्हावर तर पांडुरंग आमले ड गटातून शिट्टी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आमले परिवाराची लढाई ही स्वत:ची लढाई समजून सानपाडा येथील रहीवाशी प्रचारात सहभागी झाल्याने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांच्या तुलनेत आमले दांपत्याने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मुसंडी मारली आहे. घरटी जनसंपर्क करताना आमले रॅलीमध्ये स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने स्वत:हून सहभागी होवू लागल्याने सानपाडामधील राजकीय वातावरण रंगू लागले आहे. इतके काम करुनही भाजपकडून चांगल्या कार्यकर्त्यांचे केवळ आमदार मंदाताई समर्थंक असल्याने तिकिट कापले गेल्याचा राग स्थानिक जनतेकडून व्यक्त केला जात असल्याने आमले यांना स्थानिक रहीवाशांचे समर्थंन वाढू लागले आहे. शिवसेना-भजप उमेदवारांहून अधिक प्रतिसाद आमलेंच्या रॅलीला मिळत असल्याने येथील लढतीकडे नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.



