नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीतील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणामध्ये क्रिकेटची खेळपट्टी (पिच) व बॅडमिंटन टर्फ बनवून देण्याची युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासनाकडून या क्रिडांगणाची डागडूजी न करण्यात या क्रिडांगणाला बकालपणा प्राप्त झालेला आहे. या क्रिडांगणात जानेवारी महिना अर्धा लोटला तरी जंगली गवत तसेच आहे. कोठे उंचवटा तर कोठे खाचखळगे आहे. कोठे दगडी विखुरलेले आहे. मैदानावर सुविधा नसल्याने केवळ हे मैदान कागदोपत्री राहिले असून सिडको वसाहतीमधील तसेच सेक्टर सहामधील मुलांना खेळण्यासाठी नेरूळ सेक्टर चारचे क्रिडांगण, रामलीला मैदान, तेरणा मैदान या ठिकाणी जावे लागत आहे. स्थानिक मुलांना खेळण्यासाठी या मैदानाचा काहीही उपयोग होत नाही, ही शोकांतिका आहे. स्थानिक मुलांच्या खेळाच्या गरजा पाहता, महापालिका प्रशासनाने स्थानिक मुलांना खेळण्यासाठी तानाजी मालुसरे क्रिडांगणावर क्रिकेटची खेळपट्टी (पिच) व बॅडमिटंन टर्फ बनवून देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



