नवी मुंबई : महापालिकेचा अर्थसंकल्प बनविण्यापूर्वी जनसामान्यांकडून कामाबाबतच्या सूचना, निवेदने, प्रस्ताव मागवून जनतेचाही सहभाग घेण्याची लेखी मागणी एमआयएमचे युवा नेते आणि कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या असून लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक सभागृहात येवून नवी मुंबईचा कारभार चालवतील. लवकरच महापालिका प्रशासन नवी मुंबईचा अर्थसंकल्प बनविण्यास घेणार आहे. नगरसेवक त्यांच्या त्यांच्या प्रभागातील कामे पालिका प्रशासनाला सुचवतील. पालिका प्रशासनाने दिघा ते बेलापुरदरम्यान महापालिका हद्दीत राहणाऱ्या नवी मुंबईकरांकडून त्यांच्या विभागात कोणती कामे आवश्यक आहेत, त्यांना काय सुविधा हव्या आहेत, कोणत्या असुविधांचा त्यांना त्रास होत आहे, याबाबत मते मागवून घेणे आवश्यक आहे. म्हणजे नवी मुंबईकरांना ज्या ज्या सुविधा अपेक्षित आहेत, त्याचा अर्थसंकल्पात समावेश करुन घेण्यास पालिका प्रशासनाला प्राधान्य देता येईल व नवी मुंबईकरांना अपेक्षित असलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प पालिका प्रशासनाला बनविता येईल. नवी मुंबईकरांना अर्थसंकल्पात काय हवे आहे, प्रभागात कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याबाबत आवाहन करुन त्यांच्याकडून लेखी सूचना मागवून घेण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



