सुवर्णा खांडगेपाटील : ९१३७८०३०६०, ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : तुर्भे या ठिकाणी लवकरच कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास सुरुवात होत असून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे स्मार्ट सिटीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीची ओळख ही स्मार्ट सिटी सारखी प्रत्यक्षात दिसण्याकरिता सतत प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईसारख्या महापालिकेचा स्वतःचा असा कचऱ्यापासून निर्माण होणारा विजनिर्मिती प्रकल्प असावा, असे ध्येय समोर ठेऊन अनेक वर्ष काम करत होत्या. त्यानुसार त्यांनी २५ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र दिलेले होते. सदर पत्रामध्ये नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभुमीवर तुर्भे येथे ‘कचऱ्यापासुन वीज निर्मिती प्रकल्प’ उभारण्याबाबतची मागणी केले होती. त्यानुसार विषयांकित कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. रवींद्र भराटे, अवर मुख्य सचिव, नगरविकास – २ यांना या बाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने डॉ.रवींद्र भराटे, अवर मुख्य सचिव, नगरविकास -२ यांनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका यांना सदर प्रकल्पबाबत सविस्तर प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्राय व आवश्यक कागदपत्रांसोबत सादर करण्याचे निर्देश दिले होते. सदर प्रकरणाचा सतत पाठपुरवठा करून अखेर ५ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनासाठी व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ अन्वये एकात्मीक प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करणे या कामाचे लेटर ऑफ अॅवार्ड (एलओए) M/s R&B Greentech LLP यांना देण्यात आले असुन सदर कामाची संक्षिप्त टिप्पणी, प्रशासकीय मंजुरी आदेश, एलओए देण्यात आला. त्याची अधिकृत माहिती डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी डॉ. रवींद्र भराटे, अवर मुख्य सचिव, नगरविकास -२ यांना सुपूर्त केली. लवकरच नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनासाठी व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ अन्वये एकात्मीक प्रकल्प सार्वजनिक खाजगी लोकसहभागातून (पीपीपी) तत्वावर सुरु केला जाणार असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
सदर प्रकल्प उभारण्याकरिता अंदाजित रक्कम अठराशे ते दोन हजार कोटी येणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. सदर प्रकल्प नवी मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटी च्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच सदर पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या नवी मुंबईतील विविध सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांनी सदर विषयाबाबत मार्गदर्शन केले व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या हितासाठी आणलेल्या प्रकल्पाचे समाजसेवकांनी स्वागत केले व आमदार मंदाताई म्हात्रे यांचे अभिनंदन केले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नवी मुंबईतील विविध सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले आर. बी. बर्वे, भरत गोलतकर, निखिल भंडारी, प्रवीणकुमार देशमुख, मधुकर कोळगे, विनायक तलाठी, श्रीकांत पत्की, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, विकास सोरटे, मंगेश चव्हाण, जयंत पाटील, मालती सोनी, संजय ओबेरॉय, आरती राऊळ, किरण वर्मा, शीतल जगदाळे तसेच असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

