नवी मुंबई : राज्यात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. नवी मुंबई महापालिका सभागृहात १११ नगरसेवकांचे संख्याबळ असून भाजपचे ६५ नगरसेवक, एका अपक्ष नगरसेवकाचे भाजपला समर्थंन, शिवसेनेचे ४२ नगरसेवक, उबाठा गटाचे २ नगरसेवक आणि मनसेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. यंदा प्रथमच स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढली असून पाचवरुन ती दहावर जावून पोहोचली आहे. संख्याबळानुसार भाजपचे सहा तर शिवसेनेचे चार स्विकृत नगरसेवक सहज निवडून येवू शकतात. शिवसेनेच्या कोट्यातून कामगार नेते रविंद्र सावंत यांचे स्विकृत नगरसेवक पदासाठी जोरदार चर्चेत असून शिवसेनेने रविंद्र सावंत यांच्या माध्यमातून कामगार चळवळीला न्याय देण्याची मागणी कामगार क्षेत्रातून करण्यात येत आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात टांगा पलटी, घोडे फरार हा संवाद फेमस झाला असून त्या संवादामागे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वादाची झालरही तितकीच कारणीभूत आहे. वनमंत्री गणेश नाईक हे गेल्या काही महिन्यापासून सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असून त्या टीकेला खासदार नरेश म्हस्के, विजय चौगुले, किशोर पाटकर आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. या वादाने अनेकदा शाब्दिक पातळी घसरली असून नवी मुंबईच्या सीमा ओंलाडून अगदी पश्चिम महाराष्ट्रामधील पाटणच्या भूमीतही जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचारादरम्यान या वादाचे पडसाद भाषणादरम्यान उमटले होते.
रविंद्र सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईच्या राजकीय, सामाजिक, कामगार, धार्मिक प्रवाहात कार्यरत असून पूर्वी कॉंग्रेस पक्षात असताना पदाधिकारी म्हणून तर कधी प्रवक्ते म्हणून त्यांनी सातत्याने वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक व अन्य मातब्बर राजकीय घटकांना सातत्याने अडचणीत आणण्याचे काम केले आहे. मोरबे धरणाचा उद्घाटन सोहळा असो अथवा महापालिका मुख्यालयातील सभागृहाचा वापर असो, रविंद्र सावंत यांनी विरोधकाची भूमिका सडेतोड बजावली आहे. नवी मुंबईमध्ये नाईक विरोधक अशी रविंद्र सावंत यांची प्रतिमा आहे. तिकिट वाटपावरुन गोंधळ झाल्याने रविंद्र सावंत यांनी महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेनेत प्रवेश करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी नेतृत्व स्विकारले आहे. सध्या शिंदे-नाईक वादामध्ये शिंदे यांची बाजू घेण्यासाठी व ती बाजू सभागृहात मांडण्यासाठी एकनाथ शिंदे हे कामगार नेते रविंद्र सावंत यांना महापालिका सभागृहात स्विकृत नगरसेवक म्हणून पाठवण्याची अधिक शक्यता असल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात बोलले जात आहे.
महापालिका कामकाजाचा अनुभव, प्रशासनाशी सलोख्याचे संबंध, महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांशी सलगी, महापालिका ते मंत्रालयादरम्यान नागरी सुविधा, कर्मचारी प्रश्नांची सोडवणूक यासाठी रविंद्र सावंत यांचा सातत्याने पाठपुरावा असतो व ये-जा असते. वनमंत्री गणेश नाईक हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा भडीमार करत असताना पालिका सभागृहात नाईक समर्थकांची कोंडी करण्यासाठी तसेच सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडण्यासाठी नाईक विरोधक असलेल्या व प्रशासकीय कामकाजाची माहिती असणाऱ्या रविंद्र सावंत या सातारकर रांगड्या नेतृत्वाला एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांकडून व कामगार क्षेत्रातून केली जात आहे. रविंद्र सावंत यांची स्वत:ची कर्मचारी युनियन असून पालिका वर्तुळात नाईकांचीही श्रमिक युनियन आहे. त्यामुळे नाईकांकडून शिंदे यांच्यावर केली जाणारी टीका पाहता कोणीतरी खमक्या सभागृहात असावा अशी मागणी आता शिवसैनिकांकडूनही करण्यात येत आहे. महापालिकेत ४२ नगरसेवक निवडून आलेले आहेत. वनमंत्री नाईक शिंदेविरोधात टीका करत असतानाही विजय चौगुले, किशोर पाटकर वगळता अन्य नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना राग का येत नाही, कोणाकडून विरोधी सूर आळविला जात नाही, संताप व्यक्त केला जात नाही, याचेच नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्विकृत नगरसेवक म्हणून सभागृहात जाण्यासाठी शिवसेनेकडून अनेक जण इच्छूक असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविंद्र सावंत यांना संधी देण्याची शक्यता शिवसेनेतील काही घटकांकडून व्यक्त केली जात आहे.

