संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पामबीच मार्गावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या लोखंडी कमानी व जाहिरातींच्या डिजिटल फलकांचा मुद्दा मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष या गंभीर बाबीकडे वेधले.
नवी मुंबईमध्ये विशेषतः पामबीच मार्गावरील बेकायदा उभारण्यात आलेले डिजिटल जाहिरात फलक आणि लोखंडी सांगाडे याबाबत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, पामबीच मार्गाच्या परिसरात कोणतीही संरचना उभारण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा नियामक प्राधिकरण (एमसीझेडएमए), वाहतूक पोलिस तसेच इतर संबंधित प्राधिकरणांची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पामबीच मार्ग, मोराज सर्कल तसेच इतर ठिकाणी जाहिरातींसाठी लोखंडी सांगाडे उभारण्याची कामे सुरू आहेत.
या डिजिटल एलईडी फलकांमधून होणारा तेजस्वी प्रकाश, सतत बदलणारी दृश्ये, व्हिडिओ किंवा अॅनिमेशन यामुळे वाहनचालकांचे लक्ष काही क्षणांसाठी रस्त्यावरून हटू शकते. पामबीचसारख्या वेगवान वाहतुकीच्या मार्गावर ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी सभागृहात नमूद केले.
नागरिक व वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पामबीच मार्गावर सुरू असलेले हे अनधिकृत काम त्वरित थांबवावे आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे केली.
दरम्यान, यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी पामबीच मार्गावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर येत्या आठ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे सभागृहात स्पष्ट केले.
