उमेद मॉलच्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनाचा भक्कम संकल्प
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला ‘३६ जिल्ह्यांत उमेद मॉल’ उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय हा महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा ठरणार आहे, अशी भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे ध्येय हे केवळ एक योजना नसून, महिलांच्या स्वावलंबनाचा एक भक्कम संकल्प आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, महिलांना केवळ संधी देणे नव्हे, तर त्यांना सक्षम करून स्वाभिमानाने उभे करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने घेतली आहे. ‘उमेद मॉल’ ही संकल्पना म्हणजे बचत गटांच्या उत्पादनांना थेट आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारा क्रांतिकारी उपक्रम आहे. यामुळे लाखो महिलांच्या हाताला काम, उत्पादनांना योग्य मूल्य आणि त्यांच्या कष्टाला सन्मान मिळणार आहे. यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करते.”
यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या कार्याचा संदर्भ देताना सांगितले की, २००४ साली त्यांनी महिलांसाठी बचत गटांची छोटी सुरुवात केली होती. त्या छोट्या पावलाने आज अनेक जिल्ह्यांमध्ये बचत पतपेढ्यांचे जाळे उभे राहिले असून, असंख्य महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्वयंरोजगारातून स्वावलंबनाकडे जाणारा हा प्रवास अत्यंत प्रभावी ठरला आहे.
महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी ‘अर्बन हाट’सारख्या प्रदर्शन केंद्रांची संकल्पना राबवण्यात आली. या माध्यमातून महिलांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता आले, त्यांच्या उत्पादनांना ओळख मिळाली आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले झाले.
अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना मंदाताईंनी सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, प्रत्येक जिल्ह्यात बचत गटांसाठी वस्तू निर्मिती प्रकल्प उभारले जावेत आणि त्यांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी विक्री व प्रदर्शन केंद्रे निर्माण करण्यात यावीत. ‘उमेद मॉल’ ही योजना या दिशेने मोठी आणि प्रभावी झेप ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘जेव्हा महिलांना संधी मिळते, तेव्हा त्या केवळ स्वतःच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज घडवतात. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणाचा हा प्रवास अधिक वेगाने आणि व्यापक पातळीवर पुढे जाईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे,” असेही मंदा म्हात्रे म्हात्रे यांनी सांगितले.

