पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : युनायटेड नेशन (वॉटर )या संस्थेच्या वतीने दरवर्षी २२ मार्च या दिवशी जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे आणि त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे हा संदेश प्रसारित करण्यासाठी जागतिक जल दिनानिमित्त संपूर्ण विश्वभरात १९९३ पासून विविध उपक्रम आयोजित केले जातात.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मुख्य जलकुंभांच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता तसेच पाणीपुरवठा विभागातील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जागतिक जलदिन साजरा केला. जागतिक जलदिनाचे औचित्य साधून सर्व ठिकाणी सामुहिक जलशपथ घेण्यात आली.
पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असून पिण्यायोग्य पाण्याचे पृथ्वीवरील अत्यल्प प्रमाण लक्षात घेऊन उपलब्ध जलस्त्रोतांचे संवर्धन करणे व पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे लक्षात घेत संयुक्त राष्ट्र संघाने १९९३ पासून २२ मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने ‘पाणी आणि लिंगभाव : जिथे पाणी वाहते तिथे समानता वाढते ( Water and Gender : Where water flows, equality grows)’ हे जागतिक जलदिनाचे घोषवाक्य जाहीर केले आहे. आपण या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. यासाठी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची मी शपथ घेत आहे अशा आशयाच्या जलशपथेमध्ये पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच पाण्याचा थेंब अन् थेंब साठवून ‘कॅच द रेन’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी मी संपूर्ण सहयोग देईन व पाण्याला एक अनमोल संपदा मानून पाण्याचा वापर करेन अशीही शपथ घेण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मी, माझे कुटुंबिय व मित्र आणि शेजाऱ्यांना प्रेरीत करेन असेही प्रतिज्ञेत नमूद आहे.
नवी मुंबई हे स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे जलसमृध्द शहर असले तरी प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला किती पाण्याची गरज आहे हे ओळखून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन जागतिक जलदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
