नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानात बंद अवस्थेत असलेल्या संगीत यंत्रणेमधील संगीत पुन्हा सुरु करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखील मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानामध्ये संगीत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. तथापि या संगीत यंत्रणेमध्ये वाजविली जाणाऱ्या गाण्यांच्याबाबतीत रॉयल्टी आणि कॉपी राइट प्रकरणामुळे संगीत यंत्रणा आज बंद अवस्थेत आहेत. सकाळी उद्यानात फिरावयास येणाऱ्या नागरिकांच्या कानावर सुमधुर संगीत पडल्यास त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. त्यामुळे संगीत यंत्रणेतून गाणी न वाजता इंस्ट्रुमेंटल (वाद्य) संगीत वाजविल्यास महापालिका प्रशासनाला रॉयल्टी अथवा कॉपी राइटच्या वादाला सामोरे जावे लागणार नाही. सकाळी सकाळी कानावर संगीत पडले तरी नवी मुंबईकरांना फ्रेश वाटेल व दिवसाची सुरुवात चांगली होईल. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उद्यानांमध्ये बसविलेल्या संगीत यंत्रणेतून इंस्ट्रुमेंटल (वाद्य) संगीत सुरु करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखील मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
