पारदर्शक कारभार, समाजभिमुख धोरणांमुळे राज्य बँकेने गाठली यशाची नवी उंची
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : सामाजिक बांधिलकी आणि सहकाराच्या मुल्यांना जपत राज्य सहकारी बँकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ७०२ कोटींचा निव्वळ नफा मिळवून बँकिंग क्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत.
सुयोग्य जोखीम व्यवस्थापन, तांत्रिक आधुनिकीकरण, पारदर्शी प्रशासन आणि सेवकांचे एकत्रित प्रयत्न यांच्या बळावर राज्य बँकेने ही कामगिरी साध्य केली आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च २०२६ च्या शेवटच्या आठवडयात युध्दाच्या पार्श्वभूमीवर रोखे बाजार गडगडल्यामुळे जारी केलेल्या नियमानुसार कराव्या लागलेल्या तरतुदींमुळे इतर सर्व बँकांप्रमाणेच राज्य बँकेच्याही निव्वळ नफ्यात घट झाली आहे. अन्यथा हा नफा ९१० कोटींच्या घरात गेला असता.
आर्थिक प्रगती साधत असतानाच सामाजिक उत्तरादायित्व जपत राज्य सहकारी बँकेने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी रुपये, सन २०२४ नंतर निवृत्त झालेल्या माजी सेवकांना १० हजार रुपये दरमहा पेन्शन योजना, हयात असलेल्या सर्व माजी सेवकांना दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी आरोग्य आधार योजने अंतर्गत दरमहा पाच हजार रुपये, हयात असलेल्या सर्व माजी सेवकांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत व भारतीय खेळांसाठी ९५ लाख रुपये तसेच सहकार क्षेत्रासाठी भरीव मदत केली आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी वाशी येथील प्रशासकीय इमारतीत अत्याधुनिक असे देशातील पहिले `सहकार सुरक्षा’ या नावाने सुसज्ज `सायबर सिक्युरिटी सेंटर’ उभारले असून, सर्वसामान्य ग्राहकांसाठी युपीआय, क्युआर कोड इ.सेवाही सुरु केल्या आहेत. या सर्वांमुळे आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक उत्तरदायित्व, सहकाराचे मुल्य जपत राज्य सहकारी बँकेने केलेली ही कामगिरी राज्याच्या संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
बँकेने सन २०२२ पासून प्रती वर्षी ६०० कोटींच्या वर नक्त नफा मिळविला आहे. त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे.
अ.क्र वर्ष निव्वळ नफा
(रु.कोटीत)
१ सन २०२२ ६०३.00
२ सन २०२३ ६०९.00
३ सन २०२४ ६१५.00
४ सन २०२५ ६५१.00
५ सन २०२६ ७०२.00
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची एकूण आकडेवारी पुढील प्रमाणे.
अ.क्र तपशील रक्कम रु. कोटीत
१ निव्वळ नफा ७०२.00
२ स्वनिधी ८,१६०
३ एकूण व्यवसाय ५६,२५०
४ नेटवर्थ ५,७४५
५ प्रति कर्मचारी व्यवसाय ६८
६ सीआरएआर १८.३०%
७ रिटर्न ऑन अॅसेट १.४८%
८ ग्रॉस एनपीए ८.४६%
९ नेट एनपीए १.६५%
१० प्रोव्हिजनल कव्हरेज रेशो ८२%



