स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : परीक्षेचा निकाल आणि अभ्यासाचा ताण यातून विद्यार्थ्यांना काही काळ मोकळा श्वास घेता यावा, या उद्देशाने नेरूळ येथील ‘एन. आर. बी. एज्युकेशनल सोशल आणि कल्चरल ट्रस्ट’तर्फे ‘माझे गाव’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या गावाची परंपरा आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती मोठ्या उत्साहात सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
शालेय परीक्षा संपल्यानंतर अनेक मुले सुट्टीत आपल्या गावी जातात, मात्र जे विद्यार्थी शहरातच थांबतात त्यांना आपल्या मूळ गावाची ओढ असते. हीच उणीव भरून काढण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
माझं गाव या कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि विद्यार्थी मार्गदर्शन सत्र २३ एप्रिल २०२६ रोजी येणारे एज्युकेशनल ट्रस्टच्या विद्या संकुलात आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना नामदेव भगत म्हणाले की, “प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या संस्कृतीशी जोडलेले असणे आवश्यक आहे. कलेच्या माध्यमातून स्वतःचे गाव सादर केल्याने मुलांमधील आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपल्या मुळांची ओळख होते. जे विद्यार्थी गावी जाऊ शकले नाहीत, त्यांना या उपक्रमामुळे शाळेतच ‘गाव’ अनुभवता येईल.”
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचे वैशिष्ट्य दर्शवणारी छोटी गीते, लोककला आणि नाट्यप्रसंग सादर करू शकतात. वेशभूषा आणि बोलीभाषेच्या वापरामुळे जणू काही शाळेच्या आवारात छोटेखानी महाराष्ट्रच शाळेत अवतरनार आहे.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर, सौ वंदना पाटील तसेच शिक्षक प्रदीप खिस्ते, शेखर जगताप, आव्हाड, सौ. रंजना साळुंखे, पूर्व ठाकरे, सुनंदा नवकुडकर, सुगंधा घुले, वृषाली परदेशी,काळुराम जाधव आणि निराशा मोकल आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.



