अखिल भारतीय माथाडी संघटनेचे महापालिका आयुक्तांना निवेदन
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये महापालिकेच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळा आठ दिवसांवर आलेला आहे. पावसाळा कालावधीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात साथीच्या आजारांचा उदेक होत असतो. बाजार समिती आवारातील व्यापारी, कर्मचारी डेंग्यूमुळे यापूर्वी मृत झाले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आवारातील व्यापारी, माथाडी, मापाडी, मेहता, खरेदीदार, वारणार, स्थानिक वाहतुकदार, पालावाल महिला, बाजार समिती कर्मचारी-अधिकारी यांच्यामध्ये महापालिका प्रशासनाकडून आजारांबाबत व उपाययोजनांबाबत जनजागृती तसेच प्रबोधन होणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने बाजार समिती आवारातील फळ मार्केट, कांदा बटाटा मार्केट, भाजी मार्केट, धान्य मार्केट, किराणा दुकान मार्केट या पाचही मार्केटमध्ये आरोग्य तपासणी शिबीर लावून बाजार आवारातील प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
