सुनिकेत हांडेपाटील यांनी मांडली पालिका आयुक्तांकडे समस्या
नवी मुंबई : कोपरखैराणे परिसरातील दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचे तातडीने निवारण करण्याची लेखी मागणी शिवसेनेचे सुनिकेत हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोपरखैराणे नोड (कॉलनी) तसेच कोपरखैराणे गाव परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पिवळसर व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सदर पाणी उकळून तसेच गाळून घेतल्यानंतरही त्यातील पिवळसरपणा कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना आरोग्यविषयक त्रास जाणवत असून काहीजण आजारी पडल्याच्या घटनाही समोर येत आहेत. परिस्थिती गंभीर बनत चालली असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला व जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सुरुवातीच्या काळात गढूळ पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करतो. त्यामुळे आपण या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करावे व कोपरखैराणे नोड (कॉलनी) तसेच कोपरखैराणे गाव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी सुनिकेत हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
