नवी मुंबई : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांची महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षांस आता काही दिवसांतच सुरु होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून पहिली ते पदवीपर्यत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ठराविक रक्कम दरवर्षी देण्यात येत असते. महागाईच्या काळात मुलांचा शैक्षणिक खर्च उचलताना पालकवर्गाला तेवढा आर्थिक दिलासा प्राप्त होत असतो. परंतु २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. आता नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पाठ्यपुस्तके, दफ्तर व अन्य शालेय साहित्य खरेदी पालकवर्गाला करावी लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेची राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणना होत आहे. तिजोरीत पैसा व करोडो रुपयांच्या ठेवी असताना शिष्यवृत्तीस विलंब करणे महापालिका प्रशासनास भूषणावह नाही. संबंधितांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
