महाराष्ट्र कर्मचारी संघटनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पावसाळी कामकाजामुळे तयारीसाठी वेळ अपुरा;
किमान ६० दिवसांची मुदतवाढ अथवा मान्सूननंतर परीक्षा घेण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियंता संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नगररचना विभागातील पदस्थापना व बदली नियुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याबाबत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी परीक्षा घेण्याचा प्रशासनाचा उद्देश स्वागतार्ह असला, तरी सध्या सुरू असलेल्या पावसाळी हंगामामुळे अभियंता संवर्गावर विविध कामांचा मोठा ताण आहे. आपत्ती व्यवस्थापन, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच इतर अत्यावश्यक नागरी सेवांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
तसेच परीक्षा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आणि प्रत्यक्ष परीक्षा यामधील कालावधी अत्यंत कमी ठेवण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरेसा कालावधी उपलब्ध करून दिल्यास अधिकाधिक अधिकारी व कर्मचारी परीक्षेत सहभागी होतील आणि गुणवत्तापूर्ण स्पर्धेला चालना मिळेल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
यापूर्वी नगररचना विभागाच्या अशाच परीक्षांमध्ये अपेक्षित प्रमाणात उमेदवार यशस्वी झाले नसल्याची बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. अल्प कालावधीत परीक्षा घेतल्यास उमेदवारांच्या अपुऱ्या तयारीमुळे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे महापालिकेच्या निवड प्रक्रियेबाबत नकारात्मक संदेश जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात परीक्षेचा दिनांक आणि वार नमूद करताना तथ्यात्मक विसंगती आढळून आल्याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. परिपत्रकात ‘मंगळवार, दि. १९ जून २०२६’ असा उल्लेख करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात १९ जून २०२६ हा दिवस शुक्रवार असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून सदर परीक्षेला किमान ६० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अथवा मान्सून कालावधी संपल्यानंतर परीक्षा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे. यामुळे सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना समान संधी उपलब्ध होऊन प्रशासनाला अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची निवड करणे शक्य होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
कामगार नेते रविंद्र सावंत यांनी हेच निवेदन ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के, बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना स्वतंत्रपणे सादर केले आहे.
