स्वयम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या सहकार्याने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित योगविषयक विशेष कार्यक्रमात विविध वयोगटातील ५ हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत ‘स्वच्छतेतून आरोग्य व आरोग्यासाठी योग’ असा संदेश व्यापक स्वरूपात प्रसारित केला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कार्यक्रमाचे निमंत्रक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती गिरीश म्हात्रे व उपसभापती राजू मढवी, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, शिक्षण विभाग उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, क्रीडा विभाग उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता राजेश पवार, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या शिलादिदी, द आर्ट ऑफ लिव्हींगचे रत्नेश्वर शेट्ये, योग प्रशिक्षक प्रमोद कोकणे व दिप्ती देशपांडे आदी मान्यवर तसेच इतर अधिकारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानसिक शांती व शारीरिक क्षमतावृध्दी करणाऱ्या योगाचे महत्व केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील विविध देशांमधल्या लोकांना समजले असल्याचे सांगत वन मंत्री गणेश नाईक यांनी केवळ आजच्या योग दिनापुरते नाही तर वर्षाचे ३६५ दिवस योगासनांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले आरोग्य जपावे, असे आवाहन केले. माणसाचे मन शुध्द व संतुलित करणाऱ्या आणि संयमाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या योगाचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या माध्यमातून जगभरात वृध्दींगत केले, असे ते म्हणाले. योगाद्वारे मनाची व शरीराची निगा राखण्याप्रमाणेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचीही गरज त्यांनी विषद केली.
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आदीनाथ शंकरांपासून योगविद्येची सुरूवात झाली, असा उगमाचा उल्लेख करीत ऋषीमुनींपासून पुढे चालत आलेले हे योग ज्ञान आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले. योग म्हणजे केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर ती तनामनाची शुध्दी करणारी नियमित आचरणात आणावी अशी गोष्ट असल्याचे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी योगाचे महत्व विशद केले.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून मागील १२ वर्षांपासून नवी मुंबईत सातत्याने योगविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मन:शांती, प्रकृती स्वास्थ्य यांची योगाद्वारे जपणूक होतेच, शिवाय योगाच्या दैनंदिन आचरणामुळे आपण थकलेले वृध्द होत नाही तर मनाने नेहमी तरूण राहतो अशीही वस्तुस्थिती त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे वनमंत्री, महापौर, आमदार, आयुक्त व उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसह योगक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.
द ऑर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक प्रमोद कोकणे व दिप्ती देशपांडे यांनी सहजसाध्या पध्दतीने योगक्रिया करून घेतल्या तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या शिलादिदी यांनी मन:शांतीची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे वृक्षरोपांच्या कुंड्या व योगविषयक ग्रंथभेट देऊन पर्यावरणस्नेही स्वागत करण्यात आले.
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन ‘निरोगी वृध्दत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित जगभरात साजरा करण्यात येत असून देशातील सुपर स्वच्छ शहर असा नावलौकिक असणाऱ्या नवी मुंबईने स्वच्छता, आरोग्य आणि योग या त्रिसूत्रीचे महत्व अधोरेखित करीत विशेषत्वाने विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील आरोग्यप्रेमी नागरिकांना एकत्र आणत अत्यंत उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.


