अखिल भारतीय माथाडी संघटनेची आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात महापालिका प्रशासनाने नुकतीच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरसकट ७ हजार ५०० रुपयांची वाढ केल्याबद्दल प्रशासन, सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवक तसेच कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या कामगार संघटनांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे कंत्राटी व ठोक मानधन तत्त्वावर कार्यरत असून त्यांच्या सेवांचा प्रशासनाला सातत्याने उपयोग होत असल्याचे आमले यांनी नमूद केले आहे. समान कामासाठी समान वेतनाचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत असला तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा सुविधा मिळालेल्या नाहीत, अशी खंत माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी व्यक्त केली.
महापालिकेचे काम आणि वेतन हे प्रशासनाकडूनच दिले जात असताना मध्यस्थ ठेकेदार व कंत्राटदारांची व्यवस्था कायम ठेवण्याचे कारण काय, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनात कार्यरत कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
या मागणीमुळे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
