नवी मुंबई : कुकशेत गावात स्मशानभूमीचे तातडीने निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी शिवसेनेचे नवी मुंबई महापालिकेतील माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
कुकशेत गाव हे पूर्णपणे स्थंलातरीत गाव आहे. हर्डीलिया कंपनीमुळे या गावाला नेरूळ सेक्टर १४ मध्ये स्थंलातरीत करण्यात आले. या गावाला एमआयडीसीने भुखंड उपलब्ध करुन दिले आहेत. या गावाच्या विकासासाठी महापालिकेने आजवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केलेला आहे. या गावांत सुविधांसाठी अनेक भुखंड आरक्षित असल्याने हे आरक्षण ज्या गोष्टींसाठी राखीव आहे, त्या भुखंडावर त्याच सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. गावामध्ये सर्वप्रथम स्मशानभूमीची सोय होणे आवश्यक आहे आणि हीच महत्वाची सुविधा उपलब्ध करुन देण्यास महापालिका प्रशासनाने आजवर टाळाटाळ केलेली आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीसाठी भुखंड आरक्षित असतानाही स्मशानभूमीच्या कामास विलंब झालेला आहे. नवी मुंबईतील प्रत्येक गावाला स्वतंत्र स्मशानभूमी आहे. मग कुकशेत गाव तर पुर्नवसित गाव आहे. या गावाला सर्वप्रथम स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
कुकशेत गाव स्थंलातरीत होवून अनेक वर्षे लोटली आहेत. येथून महापालिकेचे लोकप्रतिनिधीही निवडून येतात. या गावातील ग्रामस्थांना अजूनही महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. महापालिका भुखंडावरील व्यायामशाळेलगतच स्मशानभूमीसाठी भुखंड राखीव आहे. येथे मयत झाल्यावर अंत्यविधीसाठी नेरूळ गावच्या अथवा सारसोळे गावच्या स्मशानभूमीत येथील नागरिकांना जावे लागते. आज या गावात नागरी आरोग्य केंद्र , वाहन तळ, बहूउद्देशीय मार्केट, महापालिका विभाग कार्यालये, व्यायामशाळा तसेच अनेक मंदिरांचे निर्माण होत असताना स्मशानभूमीसारखी महत्वाची सुविधा भुखंड उपलब्ध होत असतानाही निर्माण झालेली नाही. वास्तविक स्मशानभूमी ही अत्यावश्यक गरज आहे. त्याच कामाला महापालिका प्रशासनाकडून विलंब झाला आहे. या गावात तलाव होता, तलावासाठी राखीव जागा आहे. पण तो भुखंड व तलाव कोठेही पहावयास मिळत नाही. या तलावाच्या जागेबाबत प्रशासनाकडून चौकशी होणे आवश्यक आहे. स्थंलातरीत गावाला सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. सर्व बांधकामे होत असताना स्मशानभूमीच्या कामाला विलंब होणे ही खेदाची बाब आहे. उद्या स्मशानभूमीला विलंब झाल्यास याही भुखंडाची विक्री होण्याची अथवा आरक्षण बदलले जाण्याची भीती आहे. उद्या स्मशानभूमी न झाल्यास, भुखंडाची विक्री झाल्यास अथवा आरक्षण बदली झाल्यास या गावातील ग्रामस्थांना आपले मृतदेह अंत्यविधीसाठी सारसोळे आणि नेरूळ या दोन गावातील स्मशानभूमीतच न्यावे लागतील. कुकशेत गावामध्ये नागरीकरणाची प्रक्रिया वाढत असून लोकसंख्या वाढत आहेत. उद्या येथेही टॉवर उभे राहतील. लोकसंख्येत भर पडतच राहणार. त्यामुळे स्मशानभूमीची समस्या पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेवून ती तातडीने आरक्षित असलेल्या भुखंडावर तातडीने स्मशानभूमीचे काम होणे आवश्यक आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांची होत असलेली ससेहोलपट थांबविण्यासाठी संबंधितांना कुकशेत गावात आरक्षित असलेल्या भुखंडावर तातडीने स्मशानभूमी निर्माण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रतन मांडवे यांनी केली आहे.
