स्वयम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या २०५० मि.मी. व्यासाच्या मुख्य भूमिगत जलवाहिनीवर पनवेल तालुक्यातील देवद व विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत काही व्यक्तींमार्फत अनधिकृत नळजोडणी करून पाण्याचा वापर होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता मुख्य जलवाहिनीवर सुमारे १०० मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी एप्रिल २०२५ मध्ये सदर अनधिकृत नळजोडणी महानगरपालिकेमार्फत त्वरित खंडित करण्यात आली होती. तसेच विचुंबे व देवद ग्रामपंचायतींना अनधिकृत नळजोडणीद्वारे वापरलेल्या पाण्यापोटी दंडात्मक स्वरूपाची ८० लाख ९२ हजार ५६० रुपये इतकी रक्कम भरण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये मुख्य जलवाहिनीवरील ब्रेकडाऊन दुरुस्तीच्या वेळी त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे आढळून आले. सदर जोडणी खंडित करण्यासाठी महापालिकेने कारवाई हाती घेतली असता काही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे त्या वेळी सदर जोडणी खंडित करणे शक्य झाले नाही. तसेच देवद व विचुंबे ग्रामपंचायतींना सदर अनधिकृत जोडणी त्वरित काढून टाकण्याबाबत व दंडात्मक रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. तथापि, त्यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली नाही.
त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने २८ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस स्टेशन यांचेकडील पोलीस बंदोबस्तात संबंधित अनधिकृत नळजोडणी खंडित करण्यात आली.
यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या पुढील तपासणीत याच ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर पुन्हा छेडछाड करून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले. अनधिकृतरित्या वापरलेल्या पाण्याबाबत दंडात्मक स्वरूपाची १ कोटी १७ लाख ६१ हजार २३९ हजार रुपये इतकी रक्कम भरणा करण्याबाबत जिल्हा परिषद, रायगड यांना कळविण्यात आले व सदर अनधिकृत जोडणी त्वरित खंडीत करण्यासाठी कळविण्यात आले.
मुख्य जलवाहिनीशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे, अनधिकृत नळजोडणी करणे अथवा पाण्याची चोरी करणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.
सदर प्रकार तिसऱ्यांदा निदर्शनास आल्याने प्राप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १९ जून २०२६ रोजी, रात्री ११.३० ते दि २० जून २०२६ रोजी सकाळी ८ पर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलिस स्टेशन यांचे वतीने उपलब्ध मोठ्या प्रमाणातील पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत नळजोडणी निष्कासित करण्यात आली व आवश्यक उपाययोजना करण्यात आली. या ठिकाणी निगराणीकरिता सीसीटिव्ही बसविण्यात आले असून जलवाहिनीशी पुन्हा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस विभागाकडून संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

