अनंतकुमार गवई :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पाम बीच रोडलगत असलेल्या वॉकिंग ट्रॅकवरील अनेक मोठी झाडे धोकादायक अवस्थेत असून ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले फिरण्यासाठी येत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अलीकडेच चेंबूर येथे झाड कोसळून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा प्रकारची घटना नवी मुंबईत घडू नये, यासाठी पाम बीच रोडलगतच्या संपूर्ण वॉकिंग ट्रॅकवरील सर्व झाडांची तातडीने पाहणी करून धोकादायक झाडांची छाटणी किंवा आवश्यकतेनुसार तोड करण्याची मागणी शिवसैनिक महादेव पवार यांनी नेरुळ वार्ड अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वेळेत योग्य ती कार्यवाही न झाल्यास भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासनाची राहील, असा इशाराही महादेव पवार यांनी दिला आहे.

