प्रवाशांशी सुसंवाद, दर्जेदार सेवा आणि मराठी भाषा-संस्कृतीच्या जतनासाठी स्तुत्य उपक्रम
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत मराठी भाषा शिकवणी वर्गाच्या दुसऱ्या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल आणि शिव वाहतूक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने, समाजप्रबोधनकार तथा ‘आपला माणूस’ म्हणून परिचित असलेले दिलीप किसनराव आमले यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
८ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या वर्गात शेकडो अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. मराठी भाषा शिकल्यामुळे प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधता येतो, सेवा अधिक दर्जेदार बनते आणि महाराष्ट्राच्या भाषा व संस्कृतीचा सन्मान राखण्यास मदत होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी वाहतूक पोलीस उपनिरीक्षक संजय कोरडे, वाहतूक पोलीस गणेश वाघमारे, कोकण मराठी साहित्यचे अध्यक्ष मोहन भोईर, दमयंती भोईर, मराठी शिक्षक अमृत पाटील, श्री. पाटील, दर्शन दरबारचे सदस्य मनोज तिवारी, जोगेंद्र सिंग, संगीताताई दिलीप आमले, दिपाली चव्हाण तसेच संगिता दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन आणि विशेष सहकार्य व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप किसनराव आमले यांनी केले. त्यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि अमराठी चालकांना स्थानिक भाषेचे ज्ञान मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूलच्या वतीने कांत दर्शन दरबार येथे हा मोफत मराठी भाषा शिकवणी वर्ग नियमितपणे सुरू असून, सेक्टर-६, नेरूळ येथील अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये सर्व अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.

