अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांची मागणी
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सानपाडा कॉलनी नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरात डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांचा धोका वाढू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात तातडीने विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, तसेच स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी व साथीच्या आजारांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नवी मुंबईत पावसाला सुरुवात होताच दरवर्षी डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, ताप, जुलाब आणि हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. यंदाही सानपाडा कॉलनी नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले असून ताप, थंडी भरणे आणि जुलाबाच्या तक्रारी घेऊन अनेक नागरिक दवाखान्यांत उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने संबंधित भागात विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची तपासणी करावी, संशयित रुग्णांची नोंद घ्यावी आणि आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घराघरांत जाऊन सर्वेक्षण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती नागरिकांना देऊन व्यापक जनजागृती करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. साथीच्या आजारांनी त्रस्त अनेक रुग्ण खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्यामुळे ताप, मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची अचूक आकडेवारी महापालिकेकडे उपलब्ध होत नाही. परिणामी आजारांचा खरा प्रादुर्भाव आणि त्याचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास उशिरा येते. त्यामुळे संभाव्य साथीचा उद्रेक रोखण्यासाठी सक्रिय आरोग्य सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला त्वरित निर्देश देऊन विशेष आरोग्य शिबिरे, घरभेटी आणि जनजागृती अभियान राबविण्याची मागणी पांडुरंग विठ्ठल आमले यांनी केली असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

