माजी नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांची आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे मागणी;
चौकाचौकात बॅनर, सोशल मीडियाद्वारे जनजागृतीचीही सूचना
अनंततकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर साथीच्या आजारांचा धोका वाढू लागला असून प्रभाग क्रमांक २३ मध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य साथीचा उद्रेक रोखण्यासाठी प्रभाग २३ मधील सेक्टर ६, ८, १०, १६, १६-अ, सारसोळे गाव आणि कुकशेत गाव परिसरात तातडीने विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, तसेच घराघरांत जाऊन आरोग्य सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबईत दरवर्षी पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, ताप, जुलाब आणि हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. यंदाही प्रभाग २३ मध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून ताप, थंडी भरणे आणि जुलाबाच्या तक्रारी असलेले रुग्णही दवाखान्यांमध्ये वाढू लागले आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
महापालिकेने संबंधित परिसरात विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करावी, संशयित रुग्णांची नोंद घ्यावी तसेच स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घराघरांत जाऊन सर्वेक्षण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि इतर साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे, आजाराची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, साथीच्या आजारांविषयी जनजागृती प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रभागातील प्रमुख चौकांमध्ये जनजागृतीपर बॅनर लावावेत, तसेच स्थानिक प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती मोहीम राबवावी, अशी सूचनाही मांडवे यांनी केली आहे. नागरिकांचा सहभाग वाढल्यास साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात आणखी एक गंभीर बाब अधोरेखित करण्यात आली आहे. अनेक रुग्ण खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्यामुळे ताप, मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची अचूक नोंद महापालिकेकडे होत नाही. त्यामुळे आजारांचा वास्तविक प्रादुर्भाव आणि त्याचे गांभीर्य वेळेत प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. परिणामी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये विलंब होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
साथीच्या आजारांचा संभाव्य उद्रेक होण्यापूर्वीच आरोग्य विभागाला तातडीने आवश्यक निर्देश देऊन विशेष आरोग्य शिबिरे, घरभेटी, आरोग्य सर्वेक्षण आणि व्यापक जनजागृती अभियान हाती घ्यावे, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मागणीवर महापालिका प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे प्रभाग २३ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
