डासांचा प्रादुर्भाव, साचलेले पाणी आणि साथीच्या आजारांच्या धोक्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अखिल भारतीय माथाडी संघटनेचा आयुक्तांना इशारा
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात पावसाळ्यानंतर निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे हजारो व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी, वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल अखिल भारतीय माथाडी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीतील पाचही मार्केट आणि बाजार समिती मुख्यालयात तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. पांडुरंग विठ्ठल आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एपीएमसीमधील कांदा-बटाटा, फळ, भाजीपाला, धान्य आणि किराणा मार्केटमध्ये दररोज हजारो व्यापारी, माथाडी कामगार, मेहता कर्मचारी, मापाडी, पालावाल महिला, शेतकरी, वाहतूकदार, बाजार समितीचे अधिकारी-कर्मचारी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. महाराष्ट्रासह देशभरातून कृषीमाल आणि परदेशातून फळांची आयात या बाजारात होत असल्याने हा परिसर अत्यंत संवेदनशील आहे. असे असतानाही पावसामुळे साचलेले पाणी, दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दरवर्षी या परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण होत असताना यंदाही तीच परिस्थिती ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. आजारांचा उद्रेक झाल्यानंतर हालचाल करण्याऐवजी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप आरोग्य शिबिरे, तपासणी मोहीम किंवा प्रभावी जनजागृती न झाल्याने हजारो कामगारांच्या आरोग्याशी निष्काळजीपणा सुरू असल्याची टीका करण्यात आली आहे.
अखिल भारतीय माथाडी संघटनेने महापालिकेला तातडीने एपीएमसीतील पाचही मार्केट आणि मुख्यालयात आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करणे, स्वच्छता मोहीम राबविणे आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
“साथीचे आजार पसरल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजच प्रतिबंधात्मक कारवाई करा. एपीएमसीतील हजारो कामगार, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारचा खेळ सहन केला जाणार नाही. महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास संघटनेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशाराही श्री. पांडुरंग विठ्ठल आमले यांनी दिला आहे.
