जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.coom
‘बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष’ अभियानात १२५ झाडांचे वृक्षारोपण
सात वर्षांत ८०१ झाडे यशस्वीपणे जगवली
जुन्नर : ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या बेल्हे येथील ‘बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष’ अभियानाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. श्री बेल्हेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून यंदा लोखंडी सुरक्षा जाळीसह १२५ वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांत या अभियानातून लावण्यात आलेली ८०१ झाडे आजही हिरवीगार उभी असून, या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत आहेत.
उपक्रमाचे प्रणेते सुनील चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बेल्हेश्वर विद्यालय परिसरात सलग सात वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. केवळ झाडे लावण्यापुरते न थांबता प्रत्येक रोपाला लोखंडी सुरक्षा जाळी बसविणे, नियमित पाणी देणे आणि वर्षभर निगा राखणे यामुळे झाडांचे शंभर टक्के संगोपन शक्य झाले आहे.
या उपक्रमासाठी बेल्हे ग्रामस्थ, हितचिंतक आणि माजी विद्यार्थी आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ वृक्ष व सुरक्षा जाळी प्रायोजित करतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक सहभागाचीही सुंदर परंपरा या अभियानातून जपली जात आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे, पर्यावरण तज्ज्ञ अंजली साठे, उद्योजक पंकज कणसे, सावकार पिंगट, संजय चंगेडिया, शाळा समिती सदस्य गणेश चोरे, माजी शिक्षक बबनराव पिंगट, प्राचार्य राजेंद्र अभंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री बेल्हेश्वर विद्यालयात तब्बल ३८ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेले संजय तांबे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सातत्याने केलेल्या या प्रयत्नांमुळे श्री बेल्हेश्वर विद्यालयाचा परिसर आज हिरवाईने नटला असून, तो ‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. पर्यावरण संवर्धनाची ही लोकचळवळ ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत आहे.



