टिळक कॉलेज आणि केबीपी महाविद्यालयात विद्यार्थी सेनेची युनिट सक्रिय
सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई : आगामी काळातील विद्यार्थी प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नवी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये संघटन विस्ताराला वेग दिला आहे. मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरूळ येथील टिळक कॉलेज ऑफ हायर एज्युकेशन तसेच कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महाविद्यालयीन युनिटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित सभासद नोंदणी मोहिमेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमित ठाकरे यांनी दोन्ही महाविद्यालयांना भेट देत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मनविसेच्या युनिटचे उद्घाटन केले. तसेच महाविद्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सभासद नोंदणी कक्षाला भेट देऊन सुरू असलेल्या नोंदणी मोहिमेची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक तसेच महाविद्यालयीन अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
विद्यार्थी प्रश्नांवर आक्रमक भूमिका
मनविसे ही केवळ राजकीय संघटना म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारी संघटना म्हणून महाविद्यालयांमध्ये सक्रिय राहील, असे अमित ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शुल्क तसेच विद्यार्थ्यांच्या विविध हक्कांच्या प्रश्नांवर सकारात्मक आणि आक्रमकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
अमित ठाकरे यांच्या भेटीवेळी दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मनविसेच्या सभासद नोंदणी मोहिमेत सहभाग घेतला. शेकडो विद्यार्थ्यांनी मनविसेचे सदस्यत्व स्वीकारल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी तसेच शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही महाविद्यालयांत स्वतंत्र मनविसे युनिट कार्यरत करण्यात आले आहे.
नवी मुंबईत संघटन विस्ताराला वेग
महाविद्यालयीन तरुणाईशी थेट संवाद साधत संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने मनविसेने नवी मुंबईत पावले उचलली आहेत. आगामी काळात शहरातील इतर महाविद्यालयांमध्येही विद्यार्थी युनिट उभारण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील महाविद्यालयीन राजकारणात मनविसेची सक्रियता वाढण्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले आहेत.
या कार्यक्रमाला मनविसेचे सरचिटणीस तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, नवी मुंबई मनविसेचे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष प्रतीक खेडकर, सुमीत साठे, शहर सचिव विशाल भणगे, प्रद्युम्न हेगडे, शुभम दामगुडे, चेतन कराळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



