युवा सेनेचे निखिल मांडवे यांचे महापालिका आयुक्तांकडे निवेदन
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-८ येथील विस्तीर्ण राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा व सुविधा केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
नेरूळ सेक्टर-८सह सेक्टर-६, १०, २ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या उद्यानात नियमितपणे येतात. सकाळ-संध्याकाळ चालणे, व्यायाम आणि विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचीही मोठी गर्दी असते. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यानात ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारल्यास ज्येष्ठांना चालणे आणि व्यायाम केल्यानंतर काही वेळ विश्रांती व विरंगुळा घेता येईल. या केंद्रात वर्तमानपत्र वाचनासाठी व्यवस्था, कॅरमसह मनोरंजनात्मक खेळ, पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या मानसिक आनंदासाठी आणि सामाजिक सहभागासाठी अशा केंद्राची आवश्यकता असल्याचे मांडवे यांनी नमूद केले. उद्यानातील उपलब्ध जागेची पाहणी करून ज्येष्ठ नागरिक केंद्राचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरू करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
“ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाच्या उभारणीत योगदान दिले आहे. त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांना आरोग्यदायी आणि आनंदी वातावरण मिळणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र उभारणीला प्राधान्य द्यावे,” अशी अपेक्षा निखिल मांडवे यांनी व्यक्त केली.



