रोजगारनिर्मिती व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर मंत्री नितेश राणे यांचा भर
श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाबाबत ‘अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध जागा, भविष्यातील विकासाच्या संधी तसेच प्रस्तावित उपक्रमांची माहिती दिली.
या प्रकल्पासाठी कंपनीने राजापूर येथे सुमारे १०० एकर जागा अधिग्रहित केली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. प्रकल्पाच्या पुढील विस्तारासाठी गुंतवणूकदार तसेच सक्षम भागीदार सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचेही कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून गुंतवणूकदार आणि संबंधित भागीदारांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. प्रकल्पाशी संबंधित प्रशासकीय बाबी वेगाने मार्गी लावून विकासकामांना चालना देण्यावर भर देण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजापूर परिसरात बंदर विकासाच्या मोठ्या क्षमता असून, त्यांचा प्रभावीपणे वापर केल्यास कोकणातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळू शकते. प्रस्तावित प्रकल्पात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि बंदराशी संबंधित विविध उपक्रम विकसित झाल्यास स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
बंदर आणि जहाज बांधणी क्षेत्राशी संबंधित उद्योग, सेवा व पूरक व्यवसाय विकसित झाल्यास स्थानिक बाजारपेठेलाही चालना मिळणार आहे. त्यामुळे राजापूर बंदराचा विकास हा केवळ वाहतूक आणि सागरी व्यवसायापुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
कोकणातील बंदर विकासाला गती देतानाच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राजापूर बंदर व प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रकल्पाच्या प्रगतीसाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



