उंब्रज नंबर दोनमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार !
८० वर्षीय आजींच्या जबड्याचा चावा; तरुणासह चार गायी व तीन पाळीव कुत्र्यांवरही हल्ला
जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
उंब्रज (ता. जुन्नर) : उंब्रज नंबर २ येथील शेवाळपाईन परिसरात शुक्रवारी (४ सप्टेंबर) सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. या कुत्र्याने ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या जबड्याचा चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच शेताकडे मोटारसायकलवरून जाणाऱ्या ३० वर्षीय तरुणाच्या डाव्या पायाला चावा घेतला. त्यानंतर चार गायी आणि तीन पाळीव कुत्र्यांवरही हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर स्थानिक तरुणांनी धाव घेत या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला.
उंब्रज येथील कुसुम शांताराम हांडे (वय ८०) या शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजता आपल्या घराच्या दरवाजाजवळ बसल्या होत्या. त्यावेळी अचानक आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर झडप घालत त्यांच्या जबड्याचा चावा घेतला. हल्ला एवढा गंभीर होता की त्यांच्या जबड्याला मोठी दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुणे (पिंपरी) येथील वायसीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेपूर्वी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुभम जालिंदर हांडे (वय ३०, रा. उंब्रज नंबर २) हे मोटारसायकलवरून शेताकडे जात होते. त्यावेळी अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या मोटारसायकलसमोर येत त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. या हल्ल्यात शुभम जखमी झाले असून त्यांनी पिंपळवंडी आणि नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले.
जनावरांवरही हल्ला
मानवांवर हल्ला केल्यानंतर या कुत्र्याने परिसरातील जनावरांनाही लक्ष्य केले. गणेश हांडे, रवींद्र दांगट आणि कैलास दांगट यांच्या चार गायी तसेच तीन पाळीव कुत्र्यांना त्याने चावा घेतला. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक तरुणांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
कुत्र्याचा वाढता उपद्रव आणि नागरिकांवरील सलग हल्ले लक्षात आल्यानंतर परिसरातील स्थानिक तरुण तातडीने एकत्र आले. त्यांनी प्रसंगावधान राखत पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला. त्यामुळे परिसरातील इतर नागरिक, महिला आणि लहान मुलांवरील संभाव्य धोका टळला. स्थानिक तरुणांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पिंपळवंडीतही दोन दिवसांपूर्वी चौघांवर हल्ला
उंब्रजमधील घटनेच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी, बुधवारी (२ सप्टेंबर) पिंपळवंडी येथेही पिसाळलेल्या कुत्र्याने चौघांना चावा घेऊन जखमी केले होते. नक्ष क्षीरसागर (वय ४), अब्दुल मोमीन (वय २६), इंदूबाई माळी (वय ८०), सर्व रा. पिंपळवंडी (ता. जुन्नर), तसेच जयराम बारेला (वय २४, रा. १४ नंबर, ता. जुन्नर) यांना कुत्र्याने चावा घेतला होता. त्यांच्यावर पिंपळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर पिंपळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत पिंपळवंडी ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. पिंपळवंडी येथील संबंधित कुत्र्याचा त्याच दिवशी बंदोबस्त करण्यात आला होता.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
पिंपळवंडीनंतर अवघ्या दोन दिवसांत उंब्रजमध्ये पुन्हा पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिक आणि जनावरांवर हल्ला केल्याने जुन्नर तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पहाटे आणि सकाळच्या वेळी शेताकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच कारवाई करण्याऐवजी संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासनाने भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
भटक्या कुत्र्यांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
घटनाक्रम एका नजरेत
-
२ सप्टेंबर :पिंपळवंडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चौघांना चावा घेतला.
-
४ सप्टेंबर सकाळी ६.३० :शुभम हांडे यांच्यावर उंब्रजमध्ये हल्ला.
-
४ सप्टेंबर सकाळी ८ :कुसुम हांडे यांच्या जबड्याचा कुत्र्याने चावा घेतला.
-
त्यानंतर :चार गायी आणि तीन पाळीव कुत्र्यांवर हल्ला.
-
नंतर :स्थानिक तरुणांनी कुत्र्याचा बंदोबस्त केला.
-
कुसुम हांडे :गंभीर दुखापतीनंतर पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल.