जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
केंद्र-राज्यांनी समन्वयाने काम करण्याचे केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे आवाहन
परदेशी रोजगारासाठी कौशल्यासोबत भाषेचे प्रशिक्षण देण्यावर भर
मुंबई : देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजनांचा लाभ आणि रोजगाराच्या अधिक संधी मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले.
मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेस येथे बांधकाम कामगारांच्या प्रश्नांवर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले.
भारतीय कुशल व अर्धकुशल कामगारांना परदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जपान, जर्मनी यांसारख्या देशांमधील या संधींचा लाभ घेण्यासाठी कामगारांना कौशल्य प्रशिक्षणासोबत परदेशी भाषांचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मांडवीय यांनी सांगितले. यासाठी केंद्र व राज्यांनी प्रभावी यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील २७ योजनांचा आता ११ योजनांत समावेश
बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी महाराष्ट्रातील २७ कल्याणकारी योजनांचे ११ योजनांमध्ये सुलभीकरण करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. कामगारांच्या स्थलांतराची नोंद एकात्मिक पोर्टलवर ठेवून देशभरात युनिक आयडीच्या माध्यमातून लाभ देण्याची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये शिक्षण, पेन्शन, मृत्यू व अपंगत्व तसेच प्रसूती लाभांचा समावेश आहे. योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळावा यासाठी आधार आधारित पडताळणी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे.
बांधकाम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी केंद्र-राज्य समन्वय, योजनांचे सुलभीकरण आणि रोजगारक्षम कौशल्यविकास या त्रिसूत्रीवर राष्ट्रीय परिषदेत भर देण्यात आला.