मुंबई : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबई महानगर परिसरासह ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये उष्णता आणि दमटपणाचा चटका जाणवू लागला आहे. मुंबईच्या कुलाबा भागात २ ऑक्टोबर रोजी ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे दक्षिण मुंबईतील ऑक्टोबर महिन्यातील २०१३ नंतरचे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाच्या माहितीनुसार समोर आले आहे. सांताक्रूझमध्येही ३६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
नवी मुंबईतही तापमानाचा पारा वाढला असून २ ऑक्टोबरला सुमारे ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका आणि वाढलेली आर्द्रता यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडसह कोकणातील काही भागांत उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात ४ ऑक्टोबरपर्यंत उष्ण-दमट स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या मते, मान्सूनच्या माघारीच्या संक्रमण काळात वाऱ्यांची दिशा बदलल्याने समुद्राकडून येणारी गार हवा उशिरा पोहोचत आहे. यामुळे दिवसा तापमान वाढण्यास हातभार लागत आहे. पुढील काही दिवस मुंबईत कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी केलेे आहे.

