नवी मुंबई : महापौर मॅरेथॉनबाबत प्रवेशासाठी किती शुल्क आकारायचे याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणताही निर्णय अद्यापी निश्चित झालेला नसताना मॅरेथॉनची घोषणा करण्यात आलेली आहे. महापौरांच्या घोषणेनंतर महापालिका प्रशासनाकडून आता नियोजनाची लगीनघाई सुरु झालेली आहे. महापौर मॅरेथॉनबाबत सहभागी होण्याविषयी शुल्काचा कोणताही निर्णय झाला नसताना मॅरेथॉनच्या घोषणेबाबत महापालिका प्रशासनाने केलेल्या घाईची नवी मुंबईकरांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे.
एकीकडे महाराष्ट्रात पडलेला महाभयावह दुष्काळ आणि दुसरीकडे नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा करावा लागत असलेला सामना या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नसताना, सहभाग शुल्कनिश्चितीचा निर्णयही झालेला नसताना महापौर मॅरेथॉनबाबत केलेल्या घोषणचे पडसाद नवी मुंबईकरांमध्ये उमटू लागले आहेत.
२७ डिसेंबर रोजी महापौर मॅरेथॉन होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून ११ ऑक्टोबर रोजी जाहिर करण्यात आले आहे. महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकडून ठराविक शुल्क घेण्यात येत असते. त्या शुल्कातूनच स्पर्धकांना टी-शर्ट, पाणी, अल्पोहार आदी खर्च भागविला जातो. अन्य महापालिकांनीही आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांकडून शुल्क आकारले होते. स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी शर्टवर स्पॉन्सर कंपन्यांचे लोगो लावून त्या त्या महापालिकेला उत्पन्न कमविण्याची संधी असते. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून मॅरेथॉन सहभागबाबत स्पर्धकांना आकारावयाच्या शुल्काबाबत अद्यापि कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून क्रिडा व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे.
नवी मुंबईकरांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे नवी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. त्यातच आता नवी मुंबईत डिसेंबरमध्ये फॉर्म्युला-४ कार रेसिंगचा थरार रंगणार आहे. वेगवान कारचा थरार, आंतरराष्ट्रीय दर्जाची रेसिंग आणि रात्रीच्या प्रकाशझोतात धावणाऱ्या रेसिंग कारचा रोमांचक अनुभव नवी मुंबईकरांना घेता येण्याची शक्यता आहे. इंडियन रेसिंग फेस्टिव्हल २०२६ च्या अंतिम फेरीचे आयोजन ५ आणि ६ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील प्रस्तावित स्ट्रीट सर्किटवर करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे.
प्रस्तावित रेसिंग सर्किट पामबीच मार्ग परिसरात सुमारे ३.७ किलोमीटर लांबीचे असणार असून, त्यामध्ये १४ वळणांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या मार्गावर सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था आणि रेसिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी फॉर्म्युला-४ कार रेससाठी रेसिंग ट्रॅक विकसित करण्याकरिता सुमारे २७.०६ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. या स्पर्धेत फॉर्म्युला-४ इंडियन चॅम्पियनशिप आणि इंडियन रेसिंग लीगचा समावेश आहे.
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तसेच नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी महापालिका प्रशासन अन्य गोष्टींवर खर्च करत असल्याची नाराजी नवी मुंबईकरांकडून उघडपणे व्यक्त केली जावू लागली आहे. त्यातच आता विरोधकांकडून महापौर मॅरेथॉनमध्ये जमा होणारा निधी राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून राज्य सरकारकडे जमा करण्याची लेखी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

