कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहकार व कामगार विभागाची संयुक्त बैठक होणार
जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : साखर उद्योगातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सहकार व कामगार विभागाची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाने बेमुदत संप तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, अहमदनगर आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे या संघटनांनी साखर उद्योगातील कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कामगारांचे थकीत वेतन अदा करणे, बंद व आजारी साखर कारखाने पुन्हा सुरू करणे, संबंधित कामगारांचे पुनर्वसन, कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनाचे प्रश्न सोडविणे आणि साखर उद्योगातील कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, अशा महत्त्वपूर्ण मागण्या संघटनांनी मांडल्या आहेत. याशिवाय, महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ पूर्ववत लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या मागण्यांपैकी काही प्रश्न सहकार विभाग, साखर आयुक्तालय आणि कामगार आयुक्तालयाच्या अखत्यारीतील असल्याने संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रश्नांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. आगामी उच्चस्तरीय बैठकीत या मागण्यांवर संबंधित सर्व घटकांच्या उपस्थितीत सविस्तर विचारविनिमय करण्यात येणार आहे.
या बैठकीला आमदार विनय कोरे, कामगार विभागाचे उपसचिव (कामगार-२) स्वप्नील कापडणीस, अतिरिक्त कामगार आयुक्त भास्कर मामोरडे तसेच दोन्ही कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दहा साखर कारखान्यांतील कामगार संपात सहभागी
साखर उद्योगातील कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २२ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. या संपात राज्यातील सात सहकारी आणि तीन खासगी साखर कारखान्यांतील कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन शासनाकडून मिळाल्यानंतर साखर कामगार महासंघाने संप तूर्तास स्थगित केला आहे.
आता प्रस्तावित उच्चस्तरीय बैठकीत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर कोणते निर्णय होतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी काय पावले उचलली जातात, याकडे साखर उद्योगातील कामगारांचे लक्ष लागले आहे.



