‘कीर्तन’ चित्रपटाच्या पोस्टरचे चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अनावरण
जगद्गुरू प्रॉडक्शनचा अनोखा उपक्रम; सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक संस्थांना दोन कोटींचे दान
जुन्नर: कॉर्पोरेट क्षेत्रातील उज्ज्वल कारकीर्द सोडून आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याला वाहून घेतलेले डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या निर्मितीतील ‘कीर्तन’ या चित्रपटाचे पोस्टर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. ‘भक्ती की बाजार, तूच सांग विठ्ठला!’ अशी लक्षवेधी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटातून वारकरी परंपरा, भक्ती, श्रद्धा, मानवी मूल्ये आणि सामाजिक स्थित्यंतरांचा वेध घेतला जाणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये जगभरात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार श्रीरंग बारणे, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, चित्रपट वितरक अनिल थडानी, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह चित्रपटसृष्टी, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांतून प्रेरणा घेत डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्यातून समाजसेवा आणि मानवकल्याणाचा संदेश मिळतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत अध्यात्म, इतिहास आणि लोकसेवेचे विचार पोहोचविण्याचे काम ‘कीर्तन’ चित्रपट करेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही डॉ. चेतनानंद महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. आजच्या तणावपूर्ण वातावरणात ‘कीर्तन’सारखा चित्रपट समाजाचे प्रबोधन करून सकारात्मक विचारांची दिशा देण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाला सर्वदूर पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
डॉ. चेतनानंद महाराज यांनी आपल्या प्रास्ताविकात संतपरंपरेचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाला अध्यात्म आणि समर्पणाची जोड देऊन समाजाभिमुख पिढी घडविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन कोटींचे सामाजिक योगदान
या सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरू विश्वकल्याण फाउंडेशन आणि जगद्गुरू प्रॉडक्शनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत विविध संस्था तसेच गरजू व्यक्तींना तब्बल दोन कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले. या उपक्रमातून डॉ. चेतनानंद महाराज यांनी समाजसेवेचा विचार प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संत साहित्य पूजनाने झाली. प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी भक्तिगीते सादर केली. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक अतुल जगदाळे, गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार विजय गावंडे यांच्यासह संदीप पाठक, प्राजक्ता हनमघर, उपेंद्र लिमये आदी चित्रपटाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. हजारो रसिकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) या गावचे ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.