स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या ठाम भूमिकेमुळे अटल सेतू टोलनाक्यावरील कामगारांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. अटल सेतू सुरू झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत प्रथमच टोलनाक्यावर कार्यरत कामगारांना दिवाळी बोनस मिळाला असून, प्रत्येक कामगाराच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. बोनसची रक्कम मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.
अटल सेतू सुरू होत असताना स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील अनेक स्थानिक तरुणांना अटल सेतूच्या टोलनाक्यावर रोजगार उपलब्ध झाला. मात्र, टोलनाका सुरू झाल्यापासून येथे काम करणाऱ्या कामगारांना दिवाळी बोनस मिळत नसल्याची बाब समोर आली होती.
कामगारांनी ही समस्या महेंद्रशेठ घरत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रश्नात लक्ष घातले. कामगारांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला आणि सणासुदीच्या काळात बोनस मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. यासाठी त्यांनी दिल्लीतील कंत्राटदाराला बोलावून घेतले आणि कामगारांच्या बोनसचा प्रश्न निकाली काढण्याचा आग्रह धरला.
महेंद्रशेठ घरत यांच्या ठाम भूमिकेची आणि कामगारांच्या न्याय्य मागणीची दखल घेत कंत्राटदाराने ६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक कामगाराच्या बँक खात्यात पाच हजार रुपये बोनस जमा केले. गेल्या तीन वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांना पहिल्यांदाच बोनस मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कामगारांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच सर्व कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कामगारांच्या घामाला सन्मान आणि त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी हेच खऱ्या कामगार नेतृत्वाचे वैशिष्ट्य असते. महेंद्रशेठ घरत यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून हे सिद्ध केले असून, त्यांच्या पुढाकारामुळे अटल सेतू टोलनाक्यावरील कामगारांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.