सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावावर मंत्री आदिती तटकरे यांची चिंता
‘निर्भीड लेख’च्या ३० व्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे नव्या पिढीमध्ये पुस्तक वाचनाची आवड आणि वाचनासाठी आवश्यक असलेला संयम कमी होत चालला आहे. ३० सेकंदांच्या रील्स आणि व्हिडिओ पाहण्याची सवय लागलेल्या तरुण पिढीला चारशे-पाचशे पानांचे पुस्तक किंवा शंभर-दीडशे पानांचा दिवाळी अंक वाचण्यासाठी वेळ देणे कठीण जात आहे. त्यामुळे मोबाईलवर घालविणाऱ्या वेळेतील किमान निम्मा वेळ पुस्तक, कादंबरी आणि साहित्याच्या वाचनासाठी दिला, तर वैचारिक शक्ती, बौद्धिक क्षमता आणि कल्पकता निश्चितच वाढेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
दैनिक ‘निर्भीड लेख’च्या ३० व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शानदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
या सोहळ्याला ज्येष्ठ रंगकर्मी व कादंबरीकार अशोक समेळ, ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार अशोक बागवे, ज्येष्ठ कवी व समीक्षक सतीश सोळांकुरकर, ‘निर्भीड लेख’चे संपादक कांतीलाल कडू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक निकम, निवृत्त एसीपी दिलीप माने, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, सिनेनिर्माते व साहित्यिक संजय सिंगलवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी महानगरप्रमुख शिवदास कांबळे, महानगरप्रमुख अॅड. समाधान काशीद, स्वराली संगीत विद्यालयाचे गणेशबुवा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात आदिती तटकरे यांनी संपादक कांतीलाल कडू यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांचे कौतुक केले. रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, महिला बचत गटांच्या सदस्यांचा तसेच आशा व अंगणवाडी सेविकांचा गौरव असे विविध उपक्रम कडू यांच्या माध्यमातून राबविले जातात. जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही आपला सन्मान करण्यात आला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.
गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित करण्याची परंपरा जपणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. कडू यांनी निमंत्रण दिल्यानंतर या विशेष सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. आज साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. आपण गेल्या १६-१७ वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, व्यासपीठावरील अनेक मान्यवर २५ ते ५० वर्षांहून अधिक काळ आपापल्या क्षेत्रात योगदान देत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अमृत महोत्सव म्हणजे निवृत्ती नव्हे!
ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा उल्लेख करताना तटकरे म्हणाल्या की, वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणजे निवृत्त व्हायचे, असा समज असला तरी प्रत्यक्षात हा अनुभवाच्या बळावर नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा टप्पा आहे. ज्येष्ठ रंगकर्मी व कादंबरीकार अशोक समेळ हेही लवकरच वयाची ८५ वर्षे पूर्ण करणार आहेत. या दोन्ही ज्येष्ठांच्या कार्यातून वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नव्याने काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या अनुभवाचा लाभ नव्या पिढीतील लेखक, कवी आणि कलाकारांना व्हावा, हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठांच्या अनुभवातून नव्या पिढीने शिकावे!
कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपल्याला सर्व काही येते, असा फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नाही. यापूर्वी त्या क्षेत्रात काम केलेल्या ज्येष्ठांचा अनुभव समजून घेणे आणि त्यांच्याकडून शिकणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात काम करतानाही आपण ज्येष्ठांच्या कार्याचा आणि अनुभवाचा अभ्यास करतो. नव्या पिढीतील लेखक, कवी, कलाकार आणि रंगकर्मींनीही ज्येष्ठांच्या अनुभवातून प्रेरणा घ्यावी. त्यातून त्यांची वाटचाल अधिक समृद्ध आणि दीर्घकाळ टिकणारी होईल, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.
निर्भीड लेखन आणि टीका सकारात्मकतेने स्वीकारा!
‘निर्भीड लेख’च्या लेखनशैलीचा उल्लेख करताना तटकरे म्हणाल्या की, वृत्तपत्रातून अनेकदा समाजातील प्रश्नांचा आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचा आरसा दाखविला जातो. या आरशातून स्वतःकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी वृत्तपत्रांमधील टीका, सूचना आणि लोकांच्या समस्यांचे मांडलेले प्रश्न सकारात्मकतेने स्वीकारले पाहिजेत. तरच जनतेच्या प्रश्नांना न्याय देता येईल आणि समाजात अपेक्षित बदल घडवून आणता येतील. ‘निर्भीड लेख’ने सातत्याने लोकांचे प्रश्न आणि अपेक्षा निर्भीडपणे मांडल्या असून, त्यातून समाजहिताचा विचार करण्याची संधी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरी भागात राहूनही भजन मंडळांच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित भजनी मंडळींचे कौतुक केले. संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीकडे सोपविण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रकाशन सोहळ्याला माजी नगरसेवक रमेश गुडेकर, माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे, चंद्रशेखर जळे, पनवेल अर्बन बँकेचे संचालक बाबू जाधव, माजी सभापती सखाराम पाटील, समाजसेवक सचिन गायकवाड, अॅड. प्रफुल्ल म्हात्रे, असाई इंडिया ग्लास लिमिटेडचे प्रकल्पप्रमुख शिवाजी मांडे, व्यवस्थापक राकेश केणी, अनिल कदम, व्ही. के. हायस्कूलचे संचालक चिंतामण धुरी, उद्योजक तेजस डाकी, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर, शेकापचे देवा पाटील, चंद्रकांत केणी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्नाळा बँकेचे ठेवीदार, मान्यवर नागरिक आणि गायक प्रतीक जेऊरकर व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.