स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
मुंबई : संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत निवडणूक आयोगालाही कठपुतली बाहुली बनवले आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार एसआयआरच्या माध्यमातून काढून घेण्याचे काम भाजपा निवडणुक आयोगाच्या मदतीने करत आहे. मतचोरी व निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभारास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार जबाबदार आहेत, ते भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असून निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होत नाहीत. ‘अब की बार, ४०० पार’चा नारा देत संविधान बदलण्याचे भाजपाचे मनसुबे जनतेने निवडणुकीत हाणून पाडले. आता डिलिमिटेशन आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून संविधान, लोकशाही आणि संघराज्य व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा सर्व कारभार हुकूमशाहीचा आहे. देशाचे संविधान वाचवणे ही आजची गरज असून काँग्रेस पक्षाने संविधानाच्या रक्षणासाठी देशव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षाने लोकशाही व संविधान रक्षणासाठी वारंवार आंदोलने केली आहेत. संविधानाने दिलेली लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे जपण्यासाठी तसेच संविधानाच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रसने या रॅलीचे आयोजन केले आहे.
संविधान बचाव रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सहप्रभारी, खासदार, आमदार, लोकसभा व जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, लोकप्रतिनिधी सर्व फ्रंटल, सेल व विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.