नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार ना. गणेश नाईक हे ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ अभियानातर्ंगत ४ मार्च रोजी नेरूळ सेक्टर ६ ला भेट देणार आहेत. तथापि भाजी मार्केटच्या मैदानात परिक्षा कालावधीत कार्यक्रम न घेण्याची विनंती कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून करण्यात येवू लागल्याने व स्थानिक रहीवाशांचाही कॉंग्रेस पदाधिकार्याला वाढता प्रतिसाद मिळू लागल्याने पालकमंत्री आपला कार्यक्रम मैदानात घेतात की नजीकच्या समाजमंदीरात घेतात, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.
गेली साडेतीन दशके ना. गणेश नाईकांनी नवी मुंबईच्या विकासाकरीता परिश्रम घेतले आहेत, जनता दरबाराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील रहीवाशांच्या समस्या सोडविल्या आहेत. तथापि ४ मार्चचा नेरूळ सेक्टर सहामधील पालकमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम व तो कार्यक्रम मैदानावर न घेण्याची कॉंग्रेस पदाधिकार्याची फेसबुकच्या माध्यमातून झालेली मागणी त्यामुळे हा गेल्या दोन दिवसापासून ठाणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
नेरूळ, सेक्टर सहामध्ये भाजी मार्केट परिसरात हनुमान मंदीरासमोर छोटेखानी क्रिडांगण असून भाजी मार्केटमधील वर्दळ ‘कॅश’ करण्यासाठी हाकेच्या अंतरावर विस्तृत तानाजी मालुसरे क्रिडांगण असतानाही सर्वपक्षीय राजकारणी याच भाजी मार्केटलगतच्या मैदानावर कार्यक्रम घेत असतात. दहावी-बारावीच्या तसेच पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या मार्च महिन्यात दरवर्षी परिक्षा होत असतात. मुलांचे परिक्षा कालावधीतील अभ्यासाचे नुकसान होवू नये म्हणून गेल्या दीड वर्षापासून सारसोळे गावचे रहीवाशी आणि कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनातील आयुक्त, प्रशासन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, नेरूळ विभाग कार्यालय, महापौर, उपमहापौर, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि स्थानिक नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सातत्याने लेखी निवेदनातून पाठपुरावा केलेला आहे.
हे भाजी मार्केटचे मैदान नागरी वस्तीत येत असून या मैदानालगत परिसरातील सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. समोरच खासगी गृहनिर्माण सोसायट्याही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होवू नये यासाठी मनोज मेहेर गेल्या दीड वर्षापासून पोलीसांनी व पालिका प्रशासन दरबारी लेखी सातत्याने चपला झिजवून पाठपुरावा करत आहेत. या निवेदनाच्या विविध वर्तमानपत्रात बातम्याही छापून आल्या आहेत.
३ मार्चपासून दहावीच्या परिक्षा सुरू झाल्या आहेत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दुसर्याच दिवशी ४ मार्च रोजी पालकमंत्र्यांचा कार्यक्रम सांयकाळी ६ वाजता याच भाजी मार्केटच्या मैदानात आयोजित केला आहे. पालकमंत्री ना. गणेश नाईक हे कॉंग्रेसच्या मनोज मेहेर यांना जवळून ओळखत असून जनता दरबारात नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील समस्या सोडविण्यासाठी या प्रभागातून जनता दरबारात गेली काही वर्षे हेलपाटे मारणारा मनोज मेहेर हा एकमेव सामाजिक कार्यकर्ता असल्याचे ना. नाईकांनाही परिचयाचे आहे. ना. नाईकांनी तु कॉंग्रेसचा असतानाही जनता दरबारात जनतेची कामे घेवून सतत येत आहे, ही चांगली गोष्ट असल्याचे सांगत काही महिन्यापूर्वी सर्वासमोर मनोज मेहेरची प्रशंसाही केली होती.
स्थानिक समस्या सोडविण्यासाठी लेखी तक्रारींचा पालिकेच्या सातव्या मजल्यावरील सत्ताधार्यांकडे पाऊस मनोज मेहेरने पाडल्याचे महापौर सागर नाईक व उपमहापौर अशोक गावडेंनाही चांगल्याच परिचयाचे आहे. ना. नाईकांनी या मैदानात कार्यक्रम न घेता जवळच्या समाजमंदीरात घ्यावा याविषयी मनोज मेहेर यांनी फेसबुकचा आधार घेत पालकमंत्र्यांना थेट निवेदनच मांडले आहे.
परिक्षा कालावधीत पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आक्षेप घेत कार्यक्रम अन्यत्र स्थंलातरीत करण्याची मागणी हे मनोज मेहेर यांनी दाखविलेले धाडस नवी मुंबईत चर्चेचा विषय बनले आहे. मंगळवारी पालकमंत्री त्याच मैदानात कार्यक्रम घेतात की कॉंग्रेसी कार्यकर्त्यांची आणि स्थानिक जनतेची भावना लक्षात घेवून समाजमंदीरात कार्यक्रम स्थंलातरीत करतात याकडे नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे
आपला कार्यक्रमाला अथवा पालकमंत्र्यांना विरोध नाही. या ठिकाणी परिक्षा कालावधीत सार्वजनिक कार्यक्रम होवू नये आणि मुलांच्या अभ्यासात व्यक्त्य येवू नये हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे. माझ्या प्रभागातील मुलांसाठी मी गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करत आहे, ही महापौर, उपमहापौरांनाही माहिती आहे. पालकमंत्र्यांना माझी कामे व परिश्रम परिचयाचे असून कोणी कितीही गैरसमज पसरविला तरी काही फायदा होणार नाही. पालकमंत्री मुलांचा अभ्यास व परिक्षा पाहून कार्यक्रमाचे स्थळ नक्कीच बदलतील याची मला खात्री आहे.
-मनोज मेहेर
नेरूळ तालुका कॉंग्रेस चिटणिस