* मनसेचा आरटीओवर हल्लाबोल
* आरटीओचे आश्वासन
नवी मुंबई : रिक्षा परवाने मराठी भुमीपुत्रांनाच मिळावे या मागणीसाठी मंगळवारी शेकडो रिक्षाचालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली वाशी आर.टी. ओ कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून धडक दिली. यावेळी कागदपत्रांची छाननी करून मराठी युवकांनाच प्राधान्य देण्याचे आरटीओने मनसेच्या शिष्टमंडळाशी चर्चेत मान्य केले आहे. आरटीओने ही प्रक्रिया नीट न राबविता बिगर मराठी घटकांचे परवाना वितरणात चोचले पुरविल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी दिला आहे.
रिक्षा परवान्याच्या अटी शर्थीमध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असूनही परिवहन विभागामध्ये लॉटरीमध्ये परप्रातिंयाचे अर्ज मंजूर कसे केले, असा सवाल विचारून अर्जदाराकडून मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे नुसते प्रतिज्ञापत्रक न घेता त्याच्याकडून घेण्यात येणार्या ८वी ते १०वीच्या प्रमाणपत्रात मराठी विषयाचा समावेश आहे की नाही याची योग्य ती तपासणी करण्याची मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी मान्य केली. तसेच शासकीय, निमशासकीय अर्जदारांनाही रिक्षा परवाने मंजूर झाले असून त्यासंदर्भात शासनाच्या विविध आस्थापनांना (उदा. बेस्ट, मनपा, शालेय शिक्षण विभाग इत्यादी) पत्रव्यवहार करून ही बाब तपासून घेवू, असे आरटीओने मान्य केले असल्याचे मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.
मुंबई, ठाण्यासह ३१४५६ रिक्षा परवान्यामध्येही असाच घोळ असण्याचा संशय गजानन काळे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने जानेवारी २०१४ मध्ये नवी मुंबईसह ठाणे, कल्याण, मुंबई ,पेण व इतर परिसरातील रिक्षा चालकांसाठी परिवहन विभागार्ंतगत ६९३०९ रिक्षा परवान्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. मात्र लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आलेल्या अर्जदारांमध्ये परप्रातिंय विशेषत: युपी, बिहार राज्यातील रिक्षा चालकांचाच भरणा जास्त असल्याचे लक्षात आल्यावर मनसेच्या नेतृत्वाखाली ११०० ते १३०० रिक्षाचालकांनी वाशी आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या अर्जामध्ये नवी मुंबईअर्ंतगत २६८७ रिक्षा परवान्यासाठी ५ ते ६ हजाराच्या घरात ऑनलाइन अर्ज आले होते. मात्र लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आलेल्या अर्जदारांमध्ये परप्रातिंयाचा विशेषत: युपी-बिहारींचाच अधिक भरणा असल्याचा आरोप यावेळी मनसेकडून करण्यात आला.
यावेळी आरटीओशी झालेल्या चर्चेत मनसेकडून शिष्टमंडळात शहरअध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष धीरज भोईर, गजानन खबाले, विनोद पार्टे, निलेश बाणखिले, शहर सचिव संदीप गलुगडे, दत्तात्रय सुर्यवंशी, विभाग अध्यक्ष मंदार मोरे, विनय कांबळे, नितीन चव्हाण, विक्रांत मालुसरे, विनोद कडू आणि मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विवेक (बुवा) सुतार सहभागी झाले होते.