सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ पूर्वेला असणार्या सेंट ऑगस्टिन शाळेच्या मैदानावर उभी असलेली रेयॉन इंटरनॅशनल शाळेची बस आग लागल्याने मंगळवारी (दि. ४ मार्च) जळून भस्मसात झाली. ही आग लागली की लावली गेली हा भाग अद्यापि गुलदस्त्यात असला तरी या आगीमुळे शेजारच्या निवासी परिसरावरही काही काळ मृत्यूचे सावट उभे राहीले होते. त्यामुळे नेरूळ परिसरात ठिकठिकाणी बिनधास्तपणे उभ्या राहणार्या स्कूल बसेसच्या पार्किगचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडकोने सेंट ऑगस्टिन शाळेला क्रिडांगण मुलांसाठी दिले असून शाळेच्या वेळेव्यतिरिक्त स्थानिक मुलांना हे क्रिडांगण वापरण्यास मुभा आहे. तथापि या मैदानाचा वापर मुलांना खेळण्याऐवजी शालेय बसेस पार्किग करण्यासाठी होत असल्याचे बस जळाल्यामुळे उघडकीस आले आहे. मुळातच या शालेय बसेसना या क्रिडांगणावर पार्कीग करण्यासाठी कोणी परवानगी दिली? बसेसच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणी घेतली असे विविध मुद्दे उपस्थित झाले आहेत.
सेंट ऑगस्टिनजवळीलच क्रिडांगणात शालेय बसेस उभ्या राहतात, अशातला भाग नाही तर सिवूड्सच्या पश्चिमेलादेखील पोद्दार शाळेच्या बसेस बिधास्तपणे रस्त्यावर उभ्या असल्याचे गेल्या काही वर्षापासून पहावयास मिळत आहे. नेरूळ सेक्टर १०लादेखील रेल्वे रूळाला समांतर अशा स्टेशन रोडवरदेखील अनेक शालेय बसेस बिनधास्तपणे उभ्या असल्याचे पहावयास मिळतात. नेरूळ सेक्टर सहा परिसरात पेट्रोलपंपालगतच्या मार्गावर बसेस उभ्या राहत असतात.
नेरूळ पूर्वेला एलपी चौकातून डीवायपाटील कॉलेजच्या जवळून भीमाशंकर सोसायटीला जाण्याच्या मार्गालगत विद्युत वायरीखाली नवी मुंबईतील एका मातब्बर राजकारण्यांच्या स्कूल बसेस मोठ्या संख्येने उभ्या राहत असून या बसेस पार्किगसाठी विशेष व्यवस्था केल्याचे पहावयास मिळते. शालेय बसचे मालक आपल्या ड्रायव्हर, क्लीनरला बसमध्येच स्वंयपाक करण्याची व झोपण्याची मुभा देतात. बसजवळ स्वंयपाक केल्याने दुर्घटना घडल्याची अनेक प्रकरणे आहेत. सेंट ऑगस्टिन शाळेजवळील क्रिडांगणात उभ्या राहणार्या बसेसचा आडोसा घेवून अश्लिल प्रकार गेल्या काही वर्षापासून चालत असल्याचे स्थानिक रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच या बसेसचा आधार घेवून गर्दूलेही नशापाणी करत असल्याचे व क्रिडांगणावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नसल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. एका संस्थेच्या शालेय बसेस असून तो मुंबईतील रहीवाशी आहे. बसेस पार्कीग करताना सुरक्षितता महत्वाची असून बसमालक याबाबत कोणतीही दक्षता घेत नसल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळते. ऑगस्टिनजवळच्या मैदानात उभ्या असणार्या शालेय बसचे पार्किग भाडे कोण जमा करते हाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
काले को मौका मिला , तो वो चौका मारेगाही
शालेय वर्तुळात मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेंची काय दहशत आहे हे ऑगस्टिनच्या मैदानावरील बस जळाल्याने पहावयास मिळाले. शालेय बस जळाल्याचे वृत्त समजताच गजानन काळेंनी आपल्या पदाधिकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या पदाधिकार्यांनी शालेय बसेसचा पार्किग मुद्दा खोलवर तपासण्याचे निर्देश दिले. कुठेही बिनधास्तपणे पॉर्किग करणार्या शालेय बसमालकांचे मात्र धाबे दणाणल्याचे रात्रभर पहावयास मिळाले. यानिमित्ताने ‘काले को मौका मिला है, तो वो चौका मारेगाही’ अशीही चर्चा त्यांच्यामध्ये सुरू होती.