सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ पूर्वेकडील सेंट ऑसस्टिन शाळेच्या मैदानात उभ्या असणार्या स्कूल बसेसपैकी रेयॉन इंटरनॅशनल शाळेच्या एका बसला (एमएच ४३/एच २६१) अचानक आग लागून ती बस काही मिनिटातच जळून भस्मसात झाली. ही आग कशामुळे लागली याचा उलगडा झाला नसला तरी नेरूळ परिसरात शालेय बस कुठेही पार्कीग होत असल्याचे प्रकरण पुन्हा एकवार पेट घेण्याची शक्यता आहे. हे मैदान निवासी वस्तीत येत असून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पार्क केल्या जातात. आग आटोक्यात आली नसती तर नेरूळ पूर्वेकडचा बराच भाग आगीमध्ये भस्मसात झाला असता, अशी भीती परिसरातील स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
सेंट ऑगस्टिन शाळेच्या मैदानाचे दोन भाग करण्यात आले असून एका भागात मैदान तर दुसर्या भागात शालेय बस मोठ्या प्रमाणावर उभ्या केल्या जातात. मुळात हे मैदान सिडकोने शाळेच्या मुलांना शाळेच्या वेळात व स्थानिकांना इतर वेळेत खेळण्यासाठी दिलेले असताना या मैदानाला शालेय बसच्या पार्किगचा अड्डा का बनविण्यात आला असा संतप्त सवाल मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
सेंट ऑगस्टिनच्या मैदानात आग लागल्यावरही रेयॉन इंटरनॅशनलच्या बसेस मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या पहावयास मिळाल्या. सुरक्षा रक्षक असतानाही व प्रवेशद्वार बंद असतानाही आग कशी लागली हे न समजल्याचा संताप स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. या मैदानात उभ्या राहणार्या बसेसचा आडोसा घेवून गर्दुले नशा करत असल्याचे व हे गर्दुले सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
शालेय बसचे ड्रायव्हर व क्लीनर अनेकदा शाळेच्या बसमध्येच झोपणे व स्वंयपाक करणे आदी कामे करतात. स्वंयपाक बनविण्याच्या उद्योगातूनही ही आग लागली असण्याची शक्यता घटनास्थळी उपस्थित असलेले मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांनी व्यक्त केली.
या मैदानात शालेय बसच्या आडून अश्लिल प्रकार होतात, गर्दुले रात्री-अपरात्री फिरत असतात. या बसची आग पाहून आजूबाजूच्या बसेस त्वरीत हलविण्यात आल्या. या बसेस चालविणारा ठेकेदार मुंबईचा असून गेल्या अनेक वर्षापासून तो याच ठिकाणी बसेस उभ्या करत असतो. आग आटोक्यात आली नसती तर लगतच उभ्या असणार्या अन्य बसेसने व जवळच्या निवासी वस्तीनेही पेट घेतला असता तर नेरूळ पूर्वेला काही वेगळेच चित्र पहावयास लागले असते, अशी भीती घटनास्थळी उपस्थित असलेले नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांनी व्यक्त केली.
आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी कॉंग्रेसचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी धाव घेतली. नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे यादेखील काही क्षणातच आल्या. त्यापाठोपाठ कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर आणि नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील जळीत बसची पाहणी करण्यासाठी आले. काही वेळातच मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव रवींद्र वालावलकर, मनविसे सांस्कृतिक ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विवेक (बुवा) सुतार, नवी मुंबई अध्यक्ष गिरीराज दरेकर, गणेश पालवे, शाखाध्यक्ष अजय सुपेकर, दिनेश गवळी व अन्य पदाधिकार्यांचा ताफा घटनास्थळी आला. त्यांनी स्थानिक रहीवाशांशी चर्चा केली. असुरक्षित बस पॉर्किगमुळे संपूर्ण परिसरालाच भीती असल्याची काळे यांनी भीती व्यक्त केली. या संकटातून परिसराला वाचविण्याची स्थानिक रहीवाशांना काळेंना विनंती केली असता, मनविसेच्या सांस्कृतिक विभागाला याप्रकरणी खोलवर पाठपुरावा करण्याचे काळे यांनी निर्देश दिले.