नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील पालकमंत्री ना. गणेश नाईकांचे ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ हे अभियान नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरले. पालकमंत्र्यांनी अंत्यत शांतपणे हे कार्यक्रम घेण्याचे जनता दरबारात सांगितले तरी पालकमंत्री घटनास्थळी आल्यावर त्यांनाच सुरू असलेला गाण्याचा कार्यक्रम थांबवावा लागला. पालकमंत्र्यांनी कमविले अन् राष्ट्रवादीच्या स्थानिक घटकांनी गमविल्याची चर्चा नेरूळमध्ये सुरू आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील भाजी मार्केटच्या मैदानात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ हा कार्यक्रम मंगळवारी सांयकाळी ६ वाजता ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रमाविषयी नेरूळमध्ये ठिकठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होर्डिगही लावण्यात आले होते. पालकमंत्री एकीकडे शहर स्वच्छतेचा आग्रह धरतात, शहराच्या बकालपणावर नाराजी व्यक्त अनधिकृत होर्डिगविषयी संतप्त भावनाही वारंवार व्यक्त केली आहे तर दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ ुया कार्यक्रमाविषयी खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनच नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिग लागले जात असल्याचे नवी मुंबईकरांना पहावयास मिळत आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील भाजी मार्केटचे मैदान छोटेखानी असून पूर्णपणे सिडको वसाहतीमध्ये असून सभोवताली खासगी गृहनिर्माण सोसायट्याही आहेत. या मैदानापासून हाकेच्या अंतरावरच महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण व महापालिकेचे समाजमंदीर आहे.
मार्च महिन्यात होत असलेल्या परिक्षा लक्षात घेवून सार्वजनिक कार्यक्रमांमुळे मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होवू नये म्हणून सारसोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते व कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर हे गेल्या काही महिन्यापासून मार्च महिन्यात या भाजी मार्केटच्या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देवू नये म्हणून पालिका प्रशासन, सत्ताधार्यांतील महापौर, उपमहापौर व पोलीसांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. ना. नाईकांचा नियोजित कार्यक्रम अनधिकृत होर्डिगमधून पाहिल्यावर मनोज मेहेर यांनी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्यांशी संपर्क साधून कार्यक्रम स्थंलातरीत करण्याची मागणी केली. दहावीच्या परिक्षा सोमवारपासून सुरू होत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तथापि कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीला फेसबुकचा आधार घेत मनोज मेहेर यांनी जनजागृती करत सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील जनतेच्या निदर्शनास खरा प्रकार आणून देण्याचा प्रयास केला. मंगळवारी पालकमंत्र्यांना नेरूळमध्ये आगरी कोळी भवनात जनता दरबार असल्याचे समजताच मनोज मेहेर यांनी सकाळी १० वाजताच आगरी-कोळी भवनात धाव घेवून ठिय्या मांडला. दुपारी दोन वाजता पालकमंत्र्यांची भेट घेवून सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला व मुलांच्या परिक्षा – अभ्यास लक्षात घेवून याप्रकरणी आपण गेल्या काही महिन्यापासून सतत पाठपुरावा करत असल्याचे त्यांना समजावून सांगितले. मनोज मेहेर करत असलेल्या जनजागृतीची व विधायक कार्याची पालकमंत्र्यांनी प्रशंसा करून आपण साधेपणाने जनहितासाठीच हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. परंतु नेरूळ सेक्टर सहाच्या भाजी मार्केटच्या मैदानात पालकमंत्र्यांचे नियोजित वेळेपेक्षा काही उशिरा आगमन झाले, त्यावेळी त्यांना गाण्यांचा कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कार्यक्रम थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच पालकमंत्र्यांनी जे कमविले ते राष्ट्रवादीच्या स्थानिक माणसांनी गमविल्याची संतप्त भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.