अमोल शीरसागर
नवी मुंबई : एकीकडे शिवसेना, मनसे,आपने आणि काही प्रमाणात कागदोपत्री नोंदणी असलेल्या खर्याखुर्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रस्थापित एनसीपीला नवी मुंबई कार्यक्षेत्रात तगडे आव्हान निर्माण केले असतानाच दुसरीकडे भंगार माफिया मुख्तार अन्सारीच्या प्रकरणाने शिवसेना, मनसे, आप आणि खर्याखुर्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रचाराच्या रणधुमाळीत आयतेच कोलित सापडले आहे.
मुख्तार अन्सारी हा भंगार माफिया हा नवी मुंबईकरांना चांगल्याच परिचयाचा आहे. पोलिस गोपाळ सैंदाने हत्याप्रकरणात नावारूपाला आलेला मुख्तार अन्सारी नवी मुंबईत प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. नवी मुंबईतील मातब्बर राजकीय नेता जेव्हा आपण स्वत: मारूती ८०० घेवून रबाले पोलिस ठाण्यात मुख्तार अन्सारीला सोडवायला जातो, तेव्हा मुख्तार अन्सारीचे किती खोलवर लागेबांधे आहेत आणि मुख्तार अन्सारी कोणाला किती कळवळा आहे याचे पोलिसांना आणि नवी मुंबईकरांना जवळून दर्शन झाले आहे.
दोन दिवसापूर्वीच मुख्तार अन्सारीप्रकरणाने गोपाळ सैंदाने हत्याप्रकरणाला नव्याने उजाळा मिळाला आहे. भंगार माफियांमुळे पोलीस शिपायाची हत्या ही नवी मुंबई पोलीसांकरीता आजही संतापाची बाब आहे. गतलोकसभा निवडणूकीत प्रचारयंत्रणा राबविताना एनसीपी सातत्याने पत्रकार परिषदा घेवून शिवसेना उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. याच गोष्टीचे उट्टे फेडण्याची संधी शिवसेनेपुढे चालून आली आहे. नवी मुंबई पोलीसदेखील गोपाळ सैंदानेंच्या हत्येला आजही विसरलेले नाहीत. भंगार माफिया गुन्हेगारांची पाठराखण करणार्या राजकारण्यांबद्दल आजही नवी मुंबई पोलीसांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ऐन लोकसभा निवडणूकीतच निर्माण झालेले मुख्तार अन्सारी प्रकरणाचा शिवसेना, मनसे आणि आप कसा फायदा उचलतेय, त्यावरच एनसीपीच्या प्रचारयंत्रणेची कोंडी होणार आहे.