अमोल शिरसागर
नवी मुंबई :- ज्यावेळी नवी मुंबई विकसिकरणाची प्रक्रिया सिडकोने हाती घेतली, काही भाग एमआयडीसीने आपल्याकडे ठेवला, त्यावेळी आपले आई-वडील झोपले होते. म्हणून आज आपल्यावर आपल्या समाजासाठी जनजागृती करण्याची वेळ आली आहे. जनजागृती होवून हक्कासाठी लढे उभारले नाहीत, तर पुढची पिढी बरबाद होईल. आज आपल्याकडे आहे तरी काय. ४-५ रूमचे भाडे घेवून घर-संसार चालवित आहोत. हीच परिस्थिती कायम राहील्यास आपणास नजिकच्या भविष्यात भीक मागण्याशिवाय आपणाकडे पर्याय उपलब्ध नसेल असा खणखणीत इशारा आगरी समाजाच्या सद्य: परिस्थितीबाबत बोलताना शिवसेनेचे युवा नेते वैभव नाईक यांनी दिला.
सिडकोने साडेबारा टक्के भुखंडाचे वितरण करताना केवळ ९.२५ टक्केच प्रकल्पग्रस्तांच्या हातावर ठेवले आहे. प्रकल्पग्रस्तांना केवळ कागदोपत्री सुविधा दाखवून हातात काही न पडल्याने आज आगरी समाजाची व प्रकल्पग्रस्तांची अवस्था भयावह झाली आहे. प्रकल्पग्रस्तांना भुंखड देण्यास टाळाटाळ करणारी सिडको अन्य समाजाला उदारपणे भुखंडांचे वाटप करत आहे. नेरूळ सेक्टर ३० येथे मुस्लिम बोरी समाजाला मस्जिद बांधण्यासाठी १००० स्केवेअर मीटरचा भुखंड सिडकोने दिला आहे. यामुळे आगरी समाजात रोष पसरला आहे. सिडको प्रकल्पग्रस्तांना उपाशी ठेवून अन्य घटकांना तुपाशी ठेवत असल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीमध्ये संताप निर्माण होवून ती संघठीत झाली आहे. सिडकोच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांमध्ये एकजूट करण्यासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त युवा संघाने दारावे गावातील गांवदेवी मंदीराजवळ प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवले होते. या कार्यक्रमात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना वैभव नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सध्याच्या जीवनामानावर प्रकाशझोत टाकला.
आज नवी मुंबईत क्लस्टर व अन्य योजना येत आहेत. प्रकल्पग्रस्त रोजगार व शिक्षणाअभावी केवळ आपल्याजवळ असणार्या घरांच्या भाड्यावरच गुजराण करत आहेत. भविष्यात ही घरेच राहीली नाहीत तर प्रकल्पग्रस्तांचे भविष्य काय असणार असा प्रश्न उपस्थित करून वैभव नाईक पुढे म्हणाले की, आपला प्रकल्पग्रस्त समाज क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यातच समाधान मानत आहे. पहिल्या-दुसर्या बक्षिसाला प्रायोजक शोधून खिशातील ३५-४० हजार घालवून सामने आयोजित करतो. आपल्या आई-वडीलांच्या मेहनतीचे पैसे या स्पर्धांवर कशाला घालविता असा सवाल वैभव नाईकांनी यावेळी केला.
प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीमध्ये झालेली जनजागृती चांगले सुचिन्ह आहे.या आंदोलनात युवा महिला भगिनींचा सहभाग ही वेगळ्या भविष्याची नांदी ठरणार आहे. आपण आपल्या समाजाचे काही तरी देणे लागत आहोत. आंदोलने करा, उपोषणे करा, पण ज्या गोष्टीसाठी आंदोलन, उपोषण केले जात आहे, त्याचा पाठपुरावा करा. गेल्या वर्षी कोपरखैराणेतील भुमीपुत्र मैदानावर क्रिकेट स्पर्धांचे आयोजनात ६० लाख रूपयांची बक्षिसे वाटली गेली. त्यात प्रकल्पग्रस्तांना दोन मोठे भुंखड समाजासाठी विकत घेता आले असते. तीन-चार एफएसआयचे गाजर दाखविले जात आहे. सर्वसामान्यांनी अतिरिक्त एफएसआय काही प्रमाणात वापरलाही आहे. कागदोपत्री असणारी आश्वासने प्रत्यक्षात कशी आणणार, निवडणूका जवळ आल्यावरच जनतेची दिशाभूल केली जात असल्याची नाराजी वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
निवडणूकीपुरतीच राजकारण्यांना आगर्यांची आठवण येते, त्यानंतर विकासासाठी भांडल्यावर आगरी मतांची आम्हाला गरज नाही, असेही काही राजकारण्यांकडून उघडपणे सांगितले जाते. आगरी समाज हा स्वाभिमानी आहे. आपण स्वत: मेहनतीच्या कमाईतून जगत आहे. मेहनतीचा पैसाच समाजहितासाठी वापरत आहे. एमआयडीसीत हफ्ते मागून राहणीमान सुधारण्याचा आपला धंदा नाही. आंदोलन तीव्र करा. आपल्या हक्काचे आपल्या पदरात पाडून घ्या. मी सतत तुमच्या पाठीशी नाही, तर सोबत आहे. मी कधीही प्रकल्पग्रस्तांसाठी मागे हटणार नाही असे वैभव नाईकांनी आपल्या भाषणात सांगितले.
प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते राजेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीचा इतिहास सांगताना भुमीपुत्रांना आज आपल्या हक्कासाठी उपोषण करण्याची दुदैवी वेळ आल्याची नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे युवा नेते सोमनाथ वास्कर यांनीही यावेळी भाषणातून आगरी समाजाच्या कणखरपणाचे दाखले दिले.
यावेळी नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, कॉंग्रेसचे सुनिल पाटील, मनोज यशवंत मेहेर, संतोष सुतार, मनसेचे सविनय म्हात्रे, दिनेश गवळी, सानपाडा गावातील महेश मढवी, शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने, विभागप्रमुख संतोष मोरे, शाखाप्रमुख विशाल विचारे, युवा सेनेचे गिरीश म्हात्रे, सारसोळे गावचे राजेश मेहेर, अर्जुन मढवी, हरेश वैती, मंगल मढवी, दिपक वैती, तेजस मढवी, प्रतिक तांडेल उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्त समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.